• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने नागपूरला नमवून उपांत्य फेरी गाठली

ByMirror

Nov 8, 2024
महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि. धुळे) येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीमध्ये नागपूर जिल्हा संघावर 2-1 गोल ने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.


उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जिल्हा संघाचा सामना पुणे जिल्ह्याच्या संघाबरोबर होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूर हे संघ सातत्याने स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठत आहेत. शुक्रवारी (दि.8 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात नगर जिल्ह्याच्या संघाने उत्तम कामगिरी बजावत स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. विजयी संघासाठी भार्गव पिंपळे आणि भानुदास चंद यांनी मध्यंतरापूर्वी 1-1 गोल केला.


बचावफळीने उत्तरार्धात सामन्याच्या शेवटीपर्यंत उत्तम बचाव करून सामन्यातील आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेतली. संघाच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सहभागी खेळाडूंचे पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून उपांत्य फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून जेव्हिअर स्वामी आणि सहप्रशिक्षक वैभव मनोदिया हे खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन करत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *