• Wed. Oct 15th, 2025

अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू कृष्णराज टेमकर याची महाराष्ट्र संघात निवड

ByMirror

Jul 15, 2025

अमृतसर येथे होणाऱ्या डॉ.बी.सी. रॉय ट्रॉफी स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व

नगर (प्रतिनिधी)- नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र ज्युनियर बॉईज संघाच्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू कृष्णराज गुरुदत्त टेमकर याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमधील कामगिरीनुसार संपूर्ण राज्यभरामधून 36 खेळाडूंची निवड या प्रशिक्षण शिबिरासाठी करण्यात आली होती. जिल्हा संघटनेचे खेळाडू कृष्णराज टेमकर, भानुदास चंद आणि जसवीर ग्रोव्हर हे शिबिरात सहभागी झाले होते. टेमकर याच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.


कृष्णराज टेमकर हा आठरे पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून, मागील वर्षी त्याने महाराष्ट्र सब-ज्युनिअर संघाचे देखील प्रतिनिधीत्व केले होते. तो महाराष्ट्र ज्युनिअर बॉईज संघात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉ.बी.सी. रॉय ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा अमृतसर पंजाब येथे 20 ते 30 जुलै दरम्यान पार पडणार आहे.


कृष्णराज टेमकर याच्या निवडीबद्दल जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजितसिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रौनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार व सर्व सभासदांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *