• Tue. Jul 22nd, 2025

नाना डोंगरे यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर

ByMirror

Dec 21, 2023

सरपंच सेवा संघाच्या वतीने रविवारी होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे व प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांनी डोंगरे यांच्या पुरस्काराच्या नावाची घोषणा केली आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम घेऊन निस्वार्थ भावनेन तेे योगदान देत आहे. गावात वाचनालय चालवून युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु असून, पर्यावरण संवर्धन व गावात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ त्यांनी चालवली आहे.


कोरोना काळात बंद झालेली बस सेवा त्यांनी पाठपुरावा करुन ग्रामस्थांसाठी सुरु करुन दिली. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध प्रश्‍न सोडविण्याचे व नागरी सुविधा निर्माण करुन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. गावातील अनेक महत्त्वांच्या रस्ते होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन सदर कामे मार्गी लावली. विकासात्मक कार्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. ग्रामपंचायतमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


रविवारी 24 डिसेंबर रोजी शहरातील माऊली संकुल सभागृहात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते तर यादवराव पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *