• Tue. Oct 14th, 2025

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत 16 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूलची विजयी हॅट्रीक

ByMirror

Oct 6, 2025

17 वर्षा खालील मुली व 12 वर्ष वयोगटात मुलांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलला विजेतेपद; 14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विजयी


47 संघांच्या रेकॉर्ड ब्रेक सहभागाने रंगले 108 फुटबॉलचे सामने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे थरार प्रेक्षकांनी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अनुभवले. विविध गटातील अंतिम सामने रंगले होते. यामध्ये 17 वर्षा खालील मुलींच्या गटात व 12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूलने विजय मिळवला. 14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूलच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले. तर 16 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्याचा बहुमान पटकाविला.विजेत्या संघातील खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला होता. स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. यामध्ये 47 संघांचा रेकॉर्ड ब्रेक सहभाग लाभला होता. तर 108 फुटबॉलचे सामने रंगले होते.


विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघास अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते चषक व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर पाहुण्यांच्या हस्ते विविध श्रेणीतील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसं देण्यात आली. यावेळी सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिनहास, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहसचिव प्रदीप जाधव, विक्टर जोसेफ, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, राजू पाटोळे, अहमदनगर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सॅवियो वेगास, कोअर कमिटी सदस्य जेव्हिअर स्वामी, राजेश ॲंथनी, सचिन पठारे, पल्लवी सैंदाणे, अभिषेक सोनावणे, श्रेया सागडे आदींसह प्रशिक्षक, पंच व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शाळेपासूनच फुटबॉल खेळाडू घडावा या उद्देशाने या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. या स्पर्धेमुळे फुटबॉल खेळाला चालना मिळाली असून, शहरातील वातावरण फुटबॉलमय बनले आहे. शहरातील चित्र बदलत असून, फुटबॉलची क्रेझ वाढत चालली आहे. मुलांबरोबर मुलींचे संघ देखील मोठ्या संख्येने स्पर्धेत उतरल्याचे त्यांनी सांगितले.


मनोज वाळवेकर म्हणाले की, या स्पर्धेची भव्यता दरवर्षी वाढत चालली आहे. या वर्षीही शालेय संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वांच्या सहयोगाने ही स्पर्धा यशस्वी झाली. फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी नवोदित खेळाडूंना फिरोदिया शिवाजीयन्सने एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या प्रोत्साहनामुळे खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रारंभी मैदानात झुंम्बा डान्स, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक रंगले होते. तसेच यावेळी चित्रकला व फेस पेंटिंग स्पर्धा पार पडली. यामधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेदरम्यान रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रेक्षकांसह खेळाडूंनी आनंद लुटला. पाहुण्यांच्या हस्ते फिरोदिया शिवाजीयन्सच्या विविध गटातील फुटबॉल संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.


या स्पर्धेसाठी पंच म्हणून सलमान शेख, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, प्रकाश कनोजिया, महिमा पठारे, सुर्य नैना, पूजा भिंगारदिवे, जॉय शेळके, अभय साळवे, विल्यम राज यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्पर्धेचे समालोचन राहुल क्षीरसागर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
फिरोदिया शिवाजियन्स इंटर-स्कूल फुटबॉल स्पर्धा 2025 अंतिम सामन्याचा थरार.


17 वर्षा खालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये दामिनी जाधव हिने 39 व्या मिनीटाला गोल करुन 1-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलला विजेतेपद मिळवून दिले.


12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही आपले विजेतेपद कायम राखले. 3-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने विजय मिळवला. यामध्ये युवराज आहेर 5 व्या मिनीटाला गोल करुन खाते उघडले. यानंतर कुंदन बहिराम याने 9 व्या मिनीटाला व जयवर्धन मानेदेशमुख याने 43 व्या मिनीटाला प्रत्येकी 1 गोल केला.


14 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द तक्षिला स्कूल यांच्यात झालेल्या अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. दोन्ही तुल्यबळ संघाच्या उत्कृष्ट खेळाने हा सामना 0-0 गोलने अनिर्णित राहिला होता. यानंतर टाय ब्रेकवर तक्षिला स्कूलने 3-2 गोलने विजय मिळवला. तक्षिला कडून साईराज कबाडी, चिरयू लोढा व तन्मय लोढा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आर्मी स्कूलकडून सोहम हिंगे व प्रथमेश लहाडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.


16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल यांच्यात अंतिम सामन्यात आठरे पाटील स्कूलने 5-1 गोलने विजय मिळवून या स्पर्धेत सलग विजयाची हॅट्रीक केली. आठरे पाटील कडून भानुदास चंद याने गोलची हॅट्रीक केली. त्याने 18, 35 व 48 व्या मिनीटाला गोल करुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यश अल्हाट (22 मिनीट) व समर्थ तरवडे (58 मिनीट) यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आर्मी पब्लिक स्कूल कडून 31 व्या मिनीटाला अश्‍मित पांडे याने एकमेव गोल केला.


तिसऱ्या स्थानासाठी 14 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द विरुध्द सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूल कडून जतीन गायकवाड (15 मिनीट), रामचंद्र पालवे (35 मिनीट) व मोहित चौधरी (42 मिनीट) यांनी प्रत्येकी 1 गोल केला.


तसेच 16 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द विरुध्द सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात 2-0 गोलने सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंटने विजय मिळवला. आरुष पोपळघट (12 मिनीट) व सोहम सोले (14 मिनीट) यांनी प्रत्येकी 1 गोल केला.


व्यक्तिगत पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे:-
जान्हवी लंघे (पोदार इंटरनॅशनल स्कूल), वेदिका ससे (आठरे पाटील पब्लिक स्कूल), इंदिरा ब्राम्हणे (प्रवरा पब्लिक स्कूल), हृदया तडके (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल), युवराज आहेर (प्रवरा पब्लिक स्कूल), जयवर्धन मानेदेशमुख (प्रवरा पब्लिक स्कूल), वेदांत बांगर (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट), अभिनव मोरे (तक्षिला स्कूल), वेदांत ससे (आठरे पाटील पब्लिक स्कूल), प्रथमेश लहाडे (आर्मी पब्लिक स्कूल), सोहम हिंगे (आर्मी पब्लिक स्कूल), भावेश गडाख (ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल), शौर्य मोरे (तक्षिला स्कूल), साईराज कबाडी (तक्षिला स्कूल), तन्मय लोढा (तक्षिला स्कूल), रामचंद्र पालवे (प्रवरा पब्लिक स्कूल), मोहित चौधरी (प्रवरा पब्लिक स्कूल), जतीन गायकवाड (प्रवरा पब्लिक स्कूल), हर्षद सोनवणे (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), ओम लोखंडे (आठरे पाटील पब्लिक स्कूल), भानुदास चंद (आठरे पाटील पब्लिक स्कूल), अथर्व गिर्जे (आठरे पाटील पब्लिक स्कूल), आदर्श साबळे (आर्मी पब्लिक स्कूल), लक्ष्य चौहान (आर्मी पब्लिक स्कूल), अंशुमन विधाते (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), सौरभ खंडेलवाल (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), स्वराज जाधव (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट), पवनराजे वाणी (प्रवरा पब्लिक स्कूल).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *