• Wed. Dec 31st, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन

ByMirror

Dec 19, 2025

पारंपारिक गीत, रिमिक्स व रॅपची जुगलबंदी; महाराष्ट्रातील पारंपारिक झांज व ढोल पथकाने वेधले लक्ष


विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची -विशाल शेंडे (सहाय्यक धर्मदाय आयुक्त)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रातील पारंपारिक झांज व ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सहाय्यक धर्मदाय आयुक्त विशाल शेंडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, शैलेश मुनोत, सुनिता मुथा, तसेच विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी राजकुमार बनसोडे, विद्यार्थी प्रतिनिधी ओम मिसाळ, विद्यार्थिनी प्रतिनिधी नक्षत्रा इप्पलपेल्ली आदींसह शिक्षक, शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आजच्या आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. त्याचा वापर फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी व शिक्षकांनी अध्यापनासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी पाहुण्यांचे ढोल पथकाच्या गजरात स्वागत करुन विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.


सहाय्यक धर्मदाय आयुक्त विशाल शेंडे म्हणाले की, प्रत्येक मूल हे हुशार असते, त्यांना घडविण्याचे काम शिक्षक व पालकांचे असते. मुलांचा कल पाहून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होण्याकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणताही एक खेळ किंवा कला जोपासावी त्यामुळे जीवन आनंदी व निरोगी बनते. खेळातून व्यक्तीमत्व विकास होतो. सकारात्मक ऊर्जा मिळते. कोणतीही परीक्षा न देता, खेळातून क्लास वन अधिकारी होता येते. करिअरचा एक चांगला पर्याय म्हणून आपल्या आवडत्या खेळाकडे पाहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. तर या संस्थेने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू राज्याला दिले असल्याचे कौतुक केले.


पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य कैलास साबळे यांनी करून दिला. यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळांतर्गत विविध परीक्षां व स्पर्धापरीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तमिळ व हिंदी-मराठी गीतांवर नृत्य, देशभक्तीपर नृत्य आदी नृत्यांचे सादरीकरण केले. पारंपारिक गीत, रिमिक्स व रॅपची जुगलबंदी या सांस्कृतिक कार्यक्रमातून पहावयास मिळाली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक सचिन पवार व शितल डिमळे यांनी केले. विविध गुणदर्शन व शारीरिक प्रात्यक्षिकाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अबीर डोलारे, वेदिका लोंढे व कल्याणी गदादे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी राजकुमार बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता परशुराम मुळे यांनी वंदे मातरम या गीतातून केली.
…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *