• Wed. Oct 15th, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन

ByMirror

Dec 20, 2024

महाराष्ट्रातील पारंपारिक लेझिम व ढोल पथकाने वेधले लक्ष

जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे -आयुक्त यशवंत डांगे

नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महाराष्ट्रातील पारंपारिक लेझिम व ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले.


पहिल्या दिवशी इयत्ता 5 वी ते 8 वी या वर्गाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे तर दुसऱ्या दिवशी झालेल्या इयत्ता 9 ते 12 वी वर्गाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) संपत भोसले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. प्रारंभी पाहुण्यांचे ढोल पथकाच्या गजरात स्वागत करुन विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त मंडळाच्या सदस्या सुनंदाताई भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, सुनीता मुथा, पुष्पाताई फिरोदिया, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्या आशा सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, विष्णू गिरी, कैलास साबळे, शिक्षक प्रतिनिधी उज्ज्वला भंडारी, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार चेमटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रुती रकटाटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शालेय जीवन हा आयुष्याचा पाया आहे. शालेय स्नेहसंमेलनातील आठवणी कायम स्मरणात राहतात. शिक्षक व पालक हा मुलांच्या जीवनाचा पाया मजबूत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आपल्या शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन घेऊन आयुष्यात पुढे जावे. पालक व विद्यार्थी यांचा संवाद हा अत्यंत गरजेचा आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांची आवड-निवड ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये. जीवनातील ध्येय निश्‍चित करा व बेभान होवून ध्येयप्राप्त करा. जीवन जगण्यासाठी शिक्षणाबरोबर अवांतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्येही सहभाग घेतला पाहिजे. विविध क्षेत्रांमध्ये निपुणता बाळगण्यासाठी स्पर्धा आवश्‍यक असतात. जीवन कसे जगावे हे खेळ शिकवतो. सोशल मीडियामुळे मुलांच्या संस्कारावर आघात होत आहे. जीवनात शिस्त बाळगून मोबाईल व सोशाल मीडियापासून लांब राहण्याचा त्यांनी संदेश दिला.


पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) संपत भोसले म्हणाले की, दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटी मधील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. या संस्थेत शिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान असावा, असे कार्य संस्थेचे आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना ओळख नसलेल्या व्यक्तीशी जवळीक साधू नये. यामुळे अनेक गंभीर धोके निर्माण होत आहे. आपली संगत ही नेहमी आदर्श ठेवावी. अडीअडचणींसाठी आपण आपल्या गुरुजनांवर विश्‍वास ठेवावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. दहावीनंतर भविष्यातील ध्येय ठरवा. मनापासून इच्छा असल्यास त्या क्षेत्रात यश प्राप्ती होते. शालेय जीवन हा जीवनाचा पाया असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी विद्यार्थ्यांना सजग व जागरुक राहण्याचे आवाहन केले.


शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांतर्गत विविध परीक्षां व स्पर्धापरीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.पारितोषिक यादी वाचन दिपेश ओस्तवाल व दीपाली काळे यांनी केले. पहिल्या दिवशी इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी तमिळ नृत्य, देशभक्तीपर नृत्य, स्कूल चले हम आदी नृत्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी शारीरिक शिक्षण प्रात्यक्षिकांचे थरारक कवायती सादर करण्यात आल्या. तर अपयशातून यशाकडे, पंजाबी रिमिक्स, सोशल मीडिया, गरबा, बाई पण भारी देवा, पावनखिंड, देशप्रेम आदी नृत्यांचे सादरीकरणाने कार्यक्रम रंगला होता. दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे स्मिता म्हस्के, सतिश गुगळे आणि योगिनी क्षीरसागर व अध्यापक अमेय कानडे यांनी केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अनुष्का पोळ व तनिष्का चोभे, सम्यक गुगळे, वेदांती पालवे, अक्षरा फुलसौंदर, ऋग्वेद छिंदम यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी उज्वला भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संगीत अध्यापक परशुराम मुळे यांनी वंदे मातरम या गीताद्वारे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *