काव्यसंमेलनात रंगला मातृत्वाचा गौरव, कवी व कर्तृत्ववान मातांचा सन्मान
आई हे केवळ नातं नसून संस्कार, संस्कृती आणि जीवनमूल्यांची शिदोरी -सी.ए. प्रा. डॉ. शंकर अंदानी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मातृत्वाच्या अथांग भावविश्वाला साहित्यातून शब्दबद्ध करणारा, प्रेम, ममता, वात्सल्य व त्यागाचा गौरव करणारा भव्य काव्यग्रंथ ‘आई’ या विषयावर प्रकाशित करण्यात आला. साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन (सीता ट्रस्ट)च्या वतीने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे या काव्यग्रंथात तब्बल 1121 कवितांचा समावेश असून, अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील कवी-कवयित्रींच्या सर्जनशील अभिव्यक्तीला एकत्र आणण्याचे कार्य या उपक्रमातून करण्यात आले.
या ग्रंथप्रकाशन सोहळ्याचे आयोजन पद्मश्री भिकू रामजी इदाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी योगसद्गुरू महामंडलेश्वर डॉ. कृष्णदेव गिरिजी महाराज, उपक्रमाचे संयोजक तथा सीता ट्रस्टचे अध्यक्ष सी.ए. प्रा. डॉ. शंकर अंदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात सी.ए. प्रा. डॉ. शंकर अंदानी यांनी, “आई हे केवळ नातं नसून संस्कार, संस्कृती आणि जीवनमूल्यांची शिदोरी आहे. त्या ममतेला साहित्याच्या माध्यमातून शब्दरूप देण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी व दिशा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काव्यसंमेलन दुपारच्या सत्रात कवी सौ. डॉ. पल्लवी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. मंदाताई नाईक आणि पद्मश्री डॉ. उदय देशपांडे प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सादर करण्यात आलेल्या मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण कार्यक्रमाला सांस्कृतिक साज चढला.
आईच्या जिव्हाळ्याच्या, प्रेमाच्या व त्यागाच्या विविध छटा उलगडणाऱ्या कविता सादर होत असताना रसिक श्रोते भावूक झाले. या काव्यसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सौ. राहिबाई पोपरे (बीजमाता), पद्मश्री डॉ. उदय देशपांडे, खासदार मेघाताई कुलकर्णी, भाजपा महिला आघाडी (पुणे) अध्यक्षा मनीषाताई लडकत, प्रियंकाताई शेंडे-शिंदे, रोहिणी राठोड, इंडियन पोलीस मित्र संघटनेचे संचालक सुरेश राठोड, डॉ. मंदा नाईक, डॉ. पल्लवी बनसोडे, डॉ. नीलांबर गानू, डॉ. शैलजा करोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या 21 मातांना ‘आदर्श कर्तृत्ववान माता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. तसेच मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 कवी-कवयित्रींना ‘आदर्श साहित्य सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील व रुपाली पाठक यांनी केले.
