• Fri. Mar 14th, 2025

महाराष्ट्र दिनी ईव्हीएम विरोधात माहिती पत्रकाचे वाटप

ByMirror

May 2, 2023

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मोहिम

ईव्हीएमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- गावोगावी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया व्हावी, असा ठराव पास करून केंद्र सरकार, राज्य सरकार, निवडणूक आयोग व राष्ट्रपतींना पाठविण्याचे आवाहन करणार्‍या व ईव्हीएम विरोधातील माहिती पत्रक वाटप मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र दिनी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या करण्यात आली.


वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर या माहिती पत्रकाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे प्रमुख जालिंदर चोभे मास्तर, महाराष्ट्र कामगार मंचचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, आकाश जाधव, अशोक बागुल, विलास लवांडे आदी उपस्थित होते.


निवडणुकांमध्ये प्रचार दौरे हा केवळ बनाव असून, ईव्हीएमच्या सहाय्याने लोकशाहीवर खरा घाव घातला जात आहे. इसराइल सॉफ्टवेअरमुळे बहुतेक सर्वच विरोधकांना जेलमध्ये डांबले जाईल आणि हुकूमशाही मर्जीप्रमाणे निर्णय घेऊन पुन्हा 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजप सत्तेवर येणार आहे. राज्यघटनेची मोडतोड करुन हुकूमशाही राजवाट आणण्याचा घाट घातला गेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


जालिंदर चोभे मास्तर म्हणाले की, ग्रामसभेच्या ठरावाला पार्लमेंटच्या ठरावा इतकीच किंमत घटनेने दिलेली आहे. ग्रामपंचायतच्या ठरावामुळे ईव्हीएम बंद होऊन बॅलेटवर मतप्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. पण निवडणुक आयोग, सुप्रीम कोर्टापुढे ग्रामसभेचे ठराव जाणे आवश्यक आहे. ईव्हीएम विरोधी ठराव पास करून तो संबंधितांना ग्रामपंचायतीने पाठवावा अन्यथा सर्व विरोधी नेते कार्यकर्ते कामगार संघटना भाजपाच्या बी टीमचे सदस्य होऊन बसतील. देशाची लोकशाही राज्यघटना शेवटच्या घटका मोजीत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


देशात जातीवाद व धर्मांधता झपाट्याने पसरविला जात आहे. सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना व लोकशाही मुल्यांची खुलेआम उल्लंघन करून वाटेल ते बरळले जात आहे. भाजप विरोधात भूमिका घेणार्‍यांना देशद्रोही ठरवून जेलमध्ये बंद केले जात आहे. लोकशाही धोक्यात आली असताना सर्वसामान्य जनतेला उठाव करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना देखील ईव्हीएमला विरोध करण्यासाठी जेलभरो करावे लागेल. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचेही चोभे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *