चितपट कुस्त्यांचा रंगला थरार
पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हजेरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. नगर) येथे कामाक्षा देवी यात्रेनिमित्त कुस्तीचा हगामा उत्साहात पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील मल्लांनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली. यावेळी रंगलेल्या चितपट कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यात्रेच्या पहिल्या दिवशी कावडीने प्रवरा संगम येथून आणलेल्या गंगाजलाने कामाक्षा देवीला अभिषेक घालण्यात आला. रात्री भव्य छबीणा मिरवणूक पार पडून नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. दुसर्या दिवशी कुस्तीचा हगामा रंगला होता.
यामध्ये मानाची कुस्ती पै. अभिमन्यू फुले (नेप्ती) विरुध्द पै. अनिल ब्राम्हणे (राहुरी) यांच्यात जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच तुकाराम कातोरे, नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून वसंत ठोकळ, रावसाहेब साठे, अॅड. सुरेश ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, श्यामराव आंधळे, प्रकाश ठोकळ यांनी काम पाहिले. यावेळी गणेश साठे, पै. युवराज कार्ले, अनिल ठोकळ, बापू माऊली ठोकळ, हर्षवर्धन कोतकर, सर्कल नंदू साठे, संजय ठोकळ, अॅड. प्रशांत ठोकळ, सुदाम ठोकळ, अविनाश आंधळे, नितीन झरेकर, अर्जुन ठोकळ, हाबु शिंदे, मुरलीधर साठे, बबन भुजबळ, वसंत सांगळे, सुभाष झरेकर, संदीप गुंजाळ, सिध्दांत आंधळे, संदीप ढवळे, राजू ठोकळ, संदीप ठोकळ, पोपट ठोकळ, बाबा भुजबळ, प्रतिक शेळके आदी उपस्थित होते.
कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चितपट कुस्ती करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद दिली व मल्लांवर रोख बक्षीसांचा वर्षाव केला. मानाची कुस्ती फुले व ब्राम्हणे यांच्यात चांगली रंगली होती. यामध्ये दोन्ही तुल्यबळ मल्लांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.