• Thu. Mar 13th, 2025

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

ByMirror

Apr 22, 2023

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा

सामाजिक एकोपा, देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) शनिवारी (दि.22 एप्रिल) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात पार पडली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


रमजान महिन्याच्या 29 उपवासनंतर शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून 10:20 वाजे पर्यंत ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली.


ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर सामाजिक एकोपा, देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. विशेषत: मौलाना नदिम अख्तर यांनी कुरानमधील आयतचा दाखला देत कोणत्याही खोटी माहिती व अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे मुस्लिम समाजाला आवाहन केले. ते म्हणाले की, समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहे. कोणत्याही माहितीची सतत्या जो पर्यंत पडताळत नाही, तो पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. काही चूकीचे घडत असल्यास त्वरीत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे त्यांनी सांगितले.


ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प वाटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, राजकीय पुढारी उपस्थित होते. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत होते. ईदनिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *