पहिल्याच दिवशी रंगल्या नामवंत मल्लांच्या कुस्त्या
कुस्तीत ठराविकांची असलेली मक्तेदारी मोढीत काढण्याचे काम करण्यात आले -चंद्रशेखर बावनकुळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्ती हा चालाखी व चपळतेचा खेळ आहे. प्रतिस्पर्धी मल्लाला फक्त बळ लावून चालत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणात ही डावपेच खेळले जातात. मात्र ही स्पर्धा राजकारण विरहित असून फक्त आयोजक राजकीय पक्ष आहेत. इतर राजकीय पक्षांनी देखील यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तर कुस्ती हा राजकारण विरहित खेळ असावा, यासाठी कुस्तीत ठराविकांची असलेली मक्तेदारी मोढीत काढण्याचे काम करण्यात आल्याने कोणताही पक्ष कुस्ती खेळाचे आयोजन करु शकतो, असे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये शुक्रवारी (दि.21 एप्रिल) बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे राज्य सरचिटणीस विजय चौधरी, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा, विक्रमसिंह पाचपुते, अरुण मुढे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी आदी उपस्थित होते.

पुढे बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे वैभव असलेली कुस्ती स्पर्धा अहमदनगर शहरात आयोजित होते, याचा अभिमान आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाचे झेंडे शहरात डौलाने फडकत आहे. महाराष्ट्राला कुस्ती खेळाची मोठी परंपरा आहे. डिजिटल व मोबाईलच्या युगात कुस्तीचे महत्व अबाधित राखण्याचे काम अशा स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. कोरोना संक्रमणानंतर पुणे येथे महाराष्ट्र केसरी व त्यानंतर छत्रपती शिवराय कुस्ती अहमदनगर मध्ये या सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाला चालना देण्याचे काम केल्याने 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 66 पदकांची कमाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या क्रीडा स्पर्धेने मराठमोळ्या संस्कृतीचा अनुभव सगळ्यांना मिळणार आहे. अहमदनगर शहर व जिल्हा तालमीसाठी प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात तालीम संस्कृती मागे पडत गेली. कोरोनाकाळात कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. उपासमारीची वेळ मल्लांवर आली होती. कुस्ती टिकवणे व सुरू ठेवण्यासाठी मोठे आव्हान असून, यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. शिवसेना व भाजपची युती राजकीय आखाड्यात चितपट कुस्ती करुन जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, कोणतीही महत्त्वकांक्षा न ठेवता खेळाडूंना व खेळाला दिशा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वारंवार पक्षाच्या माध्यमातून अशा स्पर्धेचे आयोजन व्हावे, ही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप सातपुते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात वसंत लोढा यांनी लोप पावत चाललेल्या मातीतल्या अस्सल खेळाला उर्जितावस्था आणण्यचे व राजश्रय मिळवून देण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आदर पुनावाला यांचे मोठे सहकार्य लाभले व अनेकांच्या सहयोगाने ही स्पर्धा यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ झाला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेले बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा प्रेक्षकांसमोर झळकवून मैदानावर फिरवण्यात आली. दुपारी 4 वाजल्यापासून विविध गटातील कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले होते.
पहिल्याच दिवशी नामवंत मल्लांच्या कुस्त्या रंगल्या होत्या. कुस्तीप्रेमी देखील स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. रात्री उशीरा पर्यंत कुस्ती स्पर्धा रंगल्या होत्या. प्रेक्षकांसाठी लाईव्ह प्रेक्षपणची व्यवस्था करण्यात आली असून, डिजीटल स्कोअर बोर्डवर गुण व वेळ दर्शविण्यात येत आहे. यावेळी प्रकाश लोळगे, पै. नाना डोंगरे, नामदेव लंगोटे, मोहर हिरनवाळे, सुनिल भिंगारे, महेश लोंढे, बाळासाहेब भुजबळ, नितीन शेलार, पप्पू गर्जे, ओंकार सातपुते, अनिल जोशी, विशाल वालकर, महेश नामदे, तुषार पोटे, विवेक नाईक, पै. अनिल गुंजाळ, आनंदा शेळके आदी भाजप, शिवसेना व जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.