• Fri. Mar 14th, 2025

राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मल्लांचे इन कॅमेरा वजन

ByMirror

Apr 20, 2023

बाराशेपेक्षा जास्त मल्ल शहरात दाखल

शुक्रवारपासून दिग्गज मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 21 ते 23 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तब्बल बाराशेपेक्षा जास्त मल्ल शहरात दाखल झाले आहे. गुरुवारी (दि.20 एप्रिल) वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सर्व मल्लांचे रात्री उशीरा पर्यंत वजन घेण्याचे काम सुरु होते. स्पर्धा पारदर्शक होण्यासाठी सर्व वजन इन कॅमेरा घेण्यात आले. शुक्रवारपासून शहरात दिग्गज मल्लांचा शड्डूचा आवाज घुमणार असून, चित्तथरारक कुस्त्या रंगणार आहे.


गुरुवारी सकाळ पासूनच महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये कुस्ती मल्लांनी येण्यास सुरुवात केली होती. दुपारी 3 वाजता मल्लांचे वजन घेण्यास सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आठशेपेक्षा जास्त मल्लांनी आपली वजनं दिली. वजन गटात हेराफेरी होवू नये, यासाठी विशेष इन कॅमेरा वजन घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर इतर मल्लांना वजन घेतानाचे लाईव्ह प्रेक्षेपण देखील तेथे लावण्यात आलेल्या तीन एलईडी टिव्हीवर सुरु होते.


मॅट व मातीसाठी 48, 57, 61, 65, 70, 74, 79, 86 या गटासाठी तीन ठिकाणी स्वतंत्र्यपणे वजन घेण्यात आले. तसेच 86 ते 135 किलो खुल्या वजनगटात दिग्गज मल्लांनी हजेरी लावून आपली वजनं दिली. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांने देखील उपस्थित राहून आपले वजन खुल्या गटासाठी दिले. तसेच या स्पर्धेसाठी खास आकर्षण असलेले महाराष्ट्रील मल्ल सिकंदर शेख, माऊली कोकाटे, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड, सुदर्शन कोतकर, संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख हे देखील शहरात दाखल झाले आहेत.


वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये मातीच्या आखाड्याभोवती स्टेज व मंडपचे काम पूर्ण झाले असून, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेसह किल्ल्याची प्रतिकृती असलेली आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांचे कटआऊट देखील लावण्यात आले आहेत.


सर्व मल्लांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था शहरातील बडी साजन मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. वजनाच्या ठिकाणीच मल्लांना राहण्याचे, जेवणाचे पास देण्यात आले. या स्पर्धेसाठी शहरात दाखल झालेले नामवंत मल्ल, वस्ताद व कुस्ती क्षेत्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांचे स्वागत अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी केले. स्पर्धा संयोजन समितीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्यांनी मल्लांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *