• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

संपाला विरोध म्हणजे सरकारच्या खाजगीकरणाच्या वाटचालीचे एकप्रकारे समर्थन -अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे

ByMirror

Mar 18, 2023

भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिलचा संपाला सक्रीय पाठिंबा

जुनी पेन्शनने तिजोरीवर पडणार्‍या बोजाची आकडेवारीपेक्षा भांडवलदारांना किती सवलती दिल्या? व त्यांनी किती बुडविले? याची आकडेवारीही जाहीर करावी


अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिलचा सक्रीय पाठिंबा असल्याचे राज्य सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी जाहीर केले आहे. कर्मचार्‍यांची पगाराची आकडेवारी, सरकारी तिजोरीवर पडणारा बोजा याची आकडेवारी सरकार जाहीर करत असताना, कार्पोरेट भांडवलदारांना किती सवलती दिल्या?, किती लाख कोटी रुपये बुडवून भांडवलदारांनी बुडविले? कोणत्या भांडवलदारांनी सरकारच्या मदतीने देशाबाहेर पोबारा केला? त्यामुळे किती लाख कोटी रुपये बुडाले याचीही आकेडेवारी सरकारने जाहीर करण्याचे आवाहन भाकपच्या वतीने करण्यात आले आहे. तर संपाला विरोध म्हणजे सरकारच्या खाजगीकरणाच्या दिशेने चालू असलेल्या वाटचालीचे एकप्रकारे समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे


संप सुरु झाल्यापासून संपाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना सरकार पडद्याआडून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवून नागरिकांमध्ये संपकरींबद्दल गैरसमज निर्माण करत आहे. पेन्शन हा कर्मचार्‍यांचा हक्क असून, वृध्दापकाळातील आधार आहे. अनेक वर्षांपासून शासकीय निमशासकीय कर्मचारी भरती झालेली नाही. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे दोन लाखांच्यावर पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बँका दीड लाखाच्या वर जागा भरल्या जात नाहीत. स्पर्धा परीक्षांचे निकाल लागून ही पदे भरली जात नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची प्रचंड संख्या नोकरीच्या शोधात आहे. त्यांच्यामध्ये असंतोष आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी नवीन नोकरभरती करावी म्हणून मागणी, आंदोलने करायला हवे. जे सध्या नोकरीवर आहेत त्यांनाच आपले शत्रू समजून कुणाच्या तरी षडयंत्राला बळी पडून या संपकाळात त्यांच्यावर आगपाखड करण्यात काही अर्थ नसल्याचे कॉ. लांडे यांनी म्हंटले आहे.


मुळ विषयाला बगल देउन कुणाच्या तरी अर्धवट माहितीच्या आधारे चर्चा घडवून आपण कुणाच्या षडयंत्राला बळी पडतो आहोत, याचा चळवळीतील कार्यकर्त्यांनी व सर्वांनीच विचार करायला हवा. पेन्शन योजना, कर्मचार्‍यांनी लढून मिळवलेल्या सेवा शर्तीं ना विरोध करणे म्हणजे सरकारच्या खाजगीकरणाच्या दिशेने चालू असलेल्या वाटचालीचे एकप्रकारे समर्थन करण्यासारखेच आहे. उगीच सवंग मांडणीला बळी पडू नये व कामगार कर्मचारी वर्गात फुटपाड्या शक्ती पासून सावध राहण्याचा इशारा कॉ. लांडे यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *