अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस जिल्ह्यातील संघांचा उत्सफुर्त सहभाग लाभला. जय मल्हार (ता. नगर) संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकाविले.
या हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते झाला. दिवसभर हॉलीबॉल स्पर्धेचे सामने रंगले होते. सामने पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अंतिम सामना जय मल्हार व नवनाथ ग्रुप संघात अत्यंत अटीतटीचा झाला. यामध्ये जय मल्हार संघाने विजय मिळवला. बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, मंदा साळवे, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार आदींसह खेळाडू, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, खेळाद्वारे युवक सदृढ होऊन राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित होणार आहे. कोरोना काळात अनेक मैदानी स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील युवकांना पारंपारिक मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दत्तात्रय जाधव यांनी मैदानी खेळाने युवक शारीरिक व मानसिक दृष्टीकोनाने सक्षम बनतो. मोबाईलमध्ये गुंतलेला युवक मैदानाकडे वळल्यास त्यांचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे पंच एन.आय.एस. प्रशिक्षक प्रियंका डोंगरे-ठाणगे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे यांनी काम पाहिले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघास चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप डोंगरे यांनी केले. आभार मंदा साळवे यांनी मानले. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.