• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व खेळातून शिक्षण देण्याचे पालकांना व्हिडिओद्वारे धडे

ByMirror

Nov 24, 2022

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत निपुण भारत मिशन अंतर्गत माता पालक मेळावा उत्साहात

कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थी आनंदाने शिकतो -अनिता काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निपुण भारत मिशन अंतर्गत भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळावा उत्साहात पार पडला. यामध्ये पालकांना व्हिडिओद्वारे मुलांना कशा पध्दतीने कृतीयुक्त व खेळातून शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


प्रारंभी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्याध्यापिका अनिता काळे, उपशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा योगिता वाघमारे, शालेय पोषण आहारच्या अहिल्या सांगळे, माता पालक गटाचे संगीता नजन, सुनिता कदम, रोहिणी ससे, सोनाली कसबे, माधुरी चोथे, सोनाली रहाटळ, वर्षा कातोरे, शिवानी महापुरे, अर्चना गर्कळ, मिना सरोदे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, आई ही मुलांची पहिली गुरु असून, ती मुलांना घडवत असते. तीने ठरविल्यास मुलांचे भवितव्य उज्वल करु शकते. लहान वयातच मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम झाल्यास त्यांना पुढे अडचण येत नाही. या उपक्रमाद्वारे मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याची संकल्पना आहे. गणित विषयाचा विशेष करून यामध्ये समावेश असून, व्यवहारयुक्त गणितीय प्रक्रियाचे धडे मुलांना दिले जात आहे. कृतीद्वारे दिलेल्या शिक्षणाने विद्यार्थी आनंदाने शिकतो. निपुण म्हणजे प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाण्याच्या दृष्टीकोनाने हा उपक्रम सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.


शितल आवारे म्हणाल्या की, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी निपुण भारत मिशन शासनाने सुरु केला आहे. शासन स्तरावरून प्राप्त झालेले आयडिया व्हिडिओद्वारे पालकांना पाठविण्यात येणार आहे. तर पालक या व्हिडिओद्वारे मुलांना कृतीयुक्त हसत-खेळत शिक्षण देणार आहे. कोरोना काळात झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान या उपक्रमाद्वारे भरून काढण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट केले. उपस्थित पालकांनी व्हिडिओ मार्फत मुलांना कसे शिकवायचे? याचे चांगले ज्ञान मिळत आहे. यामुळे मुलं देखील चांगल्या प्रकारे कृतीयुक्त शिक्षण घेत आहे. त्यांचा उत्साह वाढत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *