• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

मागासवर्गीय कुटुंबीयांना मारहाण करुन घर जाळणार्‍या आरोपींना अटक व्हावी

ByMirror

Nov 12, 2022

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील त्या घटनेचा निषेध

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी मोकाट

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सारोळा, आडावाई (ता. पारनेर) येथे मागासवर्गीय कुटुंबीयांचे घराची जाळपोळ करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणार्‍या सर्व आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर मागासवर्गीय कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. आरोपींवर अ‍ॅट्रोसिटी, प्राणघातक हल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल असताना देखील पोलीस प्रशासन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राजाराम काळे, पारनेर तालुका अध्यक्ष विशाल साळवे, तालुका युवक अध्यक्ष तेजस अवचार, संघटक कृष्णा शेलार, केडगाव अध्यक्ष अभिजीत सकट आदी उपस्थित होते.


पारनेर तालुक्यातील सारोळा, आडावाई येथे पप्पू कांतीलाल वैराळ यांच्या कुटुंबीयांना जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अंबाजी फंड, दत्तात्रय फंड, हरूबाई फंड, शुभम फंड या यांच्यावर पारनेर तालुका पोलीस स्टेशनला अ‍ॅट्रॉसिटीसह प्राणघातक हल्ला करणे व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना जबर मारहाण झाल्यामुळे ते शासकीय अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेत गुन्हा नोंदवत असताना आरोपींनी त्यांचे घर जाळले. सदरील आरोपी गावात मोकाट असून, वैराळ कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

घडलेला प्रकार निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारा आहे. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, पिडीत कुटुंबीयांना समाज कल्याणच्या माध्यमातून शासकीय सुविधा व मदत मिळावी, भयभीत झालेल्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे व या गुन्ह्याचा योग्य तपास करुन पीडित कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पिडीतांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा नेहमीच मागासर्वीयांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराबाबत चर्चेत राहिला आहे. नुकतीच पारनेर तालुक्यात मागासवर्गीय कुटुंबीयांवर अन्याय होऊन त्यांचे घर जाळण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घडलेला प्रकार हा निंदनीय आहे. वारंवार जिल्ह्यात मागासवर्गीयांवर होणरा अन्याय निषेधार्ह आहे. -सुनील शिंदे (जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *