नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग पूर्णत: सुरू होण्यासाठी राहणार पाठपुरावा -हरजितसिंह वधवा
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-आष्टी रेल्वेचे उद्घाटनानंतर अहमदनगर रेल्वे स्थानक येथे आगमन झाले असता, अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक कानाडे, सुनील थोरात, अजय दिघे, संजय सपकाळ, विपुल शाह, सुनील छाजेड, संदेश रपारीया, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी रेल्वे चालकांचा पुष्पहार घालून व शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. राज्यातील अनेक मंत्र्यांचे उपस्थितीत शुक्रवारी (23 सप्टेंबर) या रेल्वेचे उद्घाटन झाले. मात्र या रेल्वेच्या रेल्वेच्या स्वागतासाठी मोजकेच लोक उपस्थित होते.
नगर -बीड – रेल्वे मार्गावरील 261 किलोमीटर पैकी नगर ते आष्टी या 66 किलोमीटर रेल्वे मार्गावर शुक्रवारपासून रेल्वे सुरू झाली आहे. अजूनही आष्टी पासून परळी पर्यंत बरेच काम बाकी आहे. या रेल्वेसाठी संघटनेच्या वतीने मागील 12 वर्षापासुन पाठपुरावा सुरू होता. अजून अंतिम टप्पा गाठणे बाकी आहे. नगर-बीड-परळी ही पूर्ण रेल्वे सुरू होण्याकरिता संघटनेचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. अहमदनगर स्टेशन आता जंक्शन झाले असून, त्यामुळे नगरकरांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे हरजितसिंह वधवा यांनी सांगितले.
या रेल्वेची वेळ आष्टी येथून सकाळी असावी आणि अहमदनगर येथून जाण्यासाठी सायंकाळी ठेवण्याची मागणी करुन, ही रेल्वे सुरू होण्यासाठी रेल्वे मंत्री, तसेच प्रयत्न करणार्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे. अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी देखील संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही रेल्वे रोज अहमदनगर येथून सकाळी 7:45 वाजता सुटेल आणि आष्टीला सकाळी 10:30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात पुन्हा आष्टी येथून सकाळी 11 वाजता सुटेल आणि दुपारी 1:55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. रविवार वगळता आठवड्यात दररोज ही रेल्वे धावणार आहे. कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोहला रेल्वे थांबणार आहे.

