• Sun. Nov 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘आयडीबीआय’च्या खाजगीकरणातून देशाचा आर्थिक कणा परदेशी हातात देण्याचा डाव -कॉ. देविदास तुळजापूरकर

ByMirror

Nov 28, 2026
तोट्याचे राष्ट्रीयीकरण आणि नफ्याचे खाजगीकरण’ खपवून घेणार नाही; अहिल्यानगरच्या बैठकीत सरकारला इशारा

तोट्याचे राष्ट्रीयीकरण आणि नफ्याचे खाजगीकरण’ खपवून घेणार नाही; अहिल्यानगरच्या बैठकीत सरकारला इशारा


जेन-झी ने या लढ्यात हिरीरीने सहभागी होऊन नेतृत्व करावे; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाचा व विदेशीकरणाचा मार्ग असल्याचा आरोप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “सात वर्षांपूर्वी बड्या उद्योजकांच्या थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या आयडीबीआय बँकेला करदाते आणि विमाधारकांच्या 25 हजार कोटी रुपयांच्या निधीतून सरकारने वाचवले; मात्र आज हीच बँक साडेनऊ हजार कोटींहून अधिक नफा कमवत असताना तिचे खाजगीकरण करून ती परदेशी कंपनीच्या घशात घालणे ही जनतेची घोर फसवणूक आहे. दोनशे वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने देशाला पारतंत्र्यात ढकलले, तसेच आज बँकांच्या विदेशीकरणातून देशाचा आर्थिक कणा परदेशी नियंत्रणाखाली देण्याचा कुटील डाव रचला जात आहे,” असा घणाघाती आरोप ‘बेट्रा’चे (BETRA) चेअरमन व युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय युनियन्सचे निमंत्रक (Convener) कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी केला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन, पुणे-अहिल्यानगर युनिट आणि अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉइज युनियन (AIBEA संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 26 नोव्हेंबर) दिल्लीगेट येथील स्पाय हॉटेलमध्ये ‘आयडीबीआय बँक खाजगीकरण आणि बँक कर्मचारी चळवळीपुढील आव्हाने’ या विषयावर सर्व बँक कर्मचाऱ्यांची विशेष मार्गदर्शन व संवाद सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. धनंजय कुलकर्णी होते. यावेळी प्रमुख वक्ते कॉ. देविदास तुळजापूरकर (चेअरमन, BETRA व निमंत्रक, युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय युनियन्स), विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे (MSBEF) जॉर्इंट सेक्रेटरी कॉ. शिरीष राणे व रिजनल सेक्रेटरी कॉ. नरेंद्र जंगम, तसेच अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉइज युनियन, अहिल्यानगरचे जनरल सेक्रेटरी कॉ. कांतिलाल वर्मा, ऑल इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक एम्प्लॉइज युनियनचे (AIBEA) जनरल सेक्रेटरी कॉ. सुजय नळे आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, पुणेचे सेक्रेटरी कॉ. महेश पारखी आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेला संपूर्ण जिल्ह्यातून विविध बँकांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी आकडेवारीसह सरकारच्या खाजगीकरण धोरणाचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, सात वर्षांपूर्वी आयडीबीआय बँकेची अनुत्पादित कर्जे (एनपीए) 35 टयांपर्यंत पोहोचली होती, तेव्हा भारत सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) जनतेच्या पैशातून 25 हजार कोटी रुपयांचे भांडवल देऊन तिला बाहेर काढले. गेल्या सात वर्षांत बँक सातत्याने वाढता नफा मिळवत असून, मागील वर्षीचा नफा 9 हजार 503 कोटी रुपये इतका आहे, तर एनपीए 1 टयाच्या खाली आला आहे. बँक तोट्यात असताना सरकारी निधी देऊन ‘तोट्याचे राष्ट्रीयीकरण’ करायचे आणि ती नफ्यात आल्यावर तिची विक्री करायची, हे कोणत्या न्यायाचे आहे? गेल्या दहा वर्षांत या बँकेने 82 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली असून, त्यातील 153 बडी कर्जे 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची आहेत. यामध्ये 70 टक्के रकमेवर पाणी सोडून केवळ 30 टक्केच वसुली झाली आहे; ही जनतेच्या पैशाची पद्धतशीर लूट आहे.


पुढे बोलताना कॉ. तुळजापूरकर म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या औद्योगिक उभारणीची पायाभरणी या बँकेच्या वित्तपुरवठ्यामुळेच झाली आहे. ‘आत्मनिर्भर’ आणि ‘स्वावलंबी’ भारताच्या घोषणा देणारे सरकार ही राष्ट्रीय संपत्ती कॅनडास्थित ‘फेअरफॅक्स’ या परदेशी कंपनीला आणि तीही अत्यंत कमी मूल्यात का विकू पाहत आहे? सरकारी बँकांमध्येच सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित असून, खाजगीकरण जनतेच्या व कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही. या बँकेचे खाजगीकरण झाल्यास राज्यघटनेतील आर्थिक समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला जाईल, आरक्षण धोरण संपुष्टात येईल आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांवर गदा येईल. आयडीबीआयच्या माध्यमातून सर्वच सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याचे सरकारचे मनसुबे असून, याविरोधात सर्वसामान्य जनतेने तीव्र विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी कामगार चळवळीत ‘एआयबीईए’च्या (AIBEA) योगदानाचे आणि संघटनेच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेमुळे बँक कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक व कामाचा ताण वाढला आहे. सकृद्दर्शनी हा लढा केवळ आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाविरोधातील वाटत असला, तरी याला वेळीच प्रतिकार केला नाही, तर उर्वरित सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाचा व विदेशीकरणाचा मार्ग मोकळा होईल. हा आपल्या अस्तित्वाचा, भविष्याचा आणि देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आहे. एआयबीईएने बँकांचे राष्ट्रीयीकरण घडवून आणले आणि गेली 70 वर्षे त्याचे जतन केले; आता ही जबाबदारी नव्या पिढीवर आहे. बँकिंग क्षेत्रात आज 60 ते 70 टक्क्याहून अधिक संख्येने असलेल्या युवा पिढीने (जेन-झी) या लढ्यात हिरीरीने सहभागी होऊन नेतृत्व करावे आणि सरकारला आपली एकजुटीची ताकद दाखवून द्यावी. तसेच जनतेनेही ही बाब समजून घेऊन बँक कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. सुजय नळे यांनी केले. सूत्रसंचालन बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, पुणेचे (BOMEU Pune) ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. प्रकाश कोटा यांनी केले, तर आभार कॉ. नंदकुमार तामडे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *