• Sun. Nov 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीतूनच विश्‍वशांतीचा संदेश’-डॉ. श्रीपाल सबनीस

ByMirror

Nov 28, 2026
कै. मंगलाताई घोरपडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त साहित्यिक सोहळा

ॲड. डी.डी. घोरपडे लिखित व गणराज प्रकाशन प्रकाशित ‘भारतीय संस्कृतीचा इतिहास’ ग्रंथाचे प्रकाशन;


कै. मंगलाताई घोरपडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त साहित्यिक सोहळा


सिंधू संस्कृतीपासून भागवत धर्मापर्यंतचा भारतीय विचारांचा प्रवास ‘भारतीय संस्कृतीचा इतिहास’


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विश्‍वात सर्वत्र संघर्ष आणि युद्धाचे वातावरण निर्माण झाले असून, मनातील युद्ध आणि जगातील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. मात्र, विश्‍वाला आणि मानवाला खऱ्या अर्थाने शांतता मिळवायची असेल, तर अध्यात्म आणि मानवतावादी विचारांची नितांत गरज आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संपूर्ण विश्‍वाला शांततेचा संदेश देणारे असून, त्याचे प्रतिबिंब ॲड. डी.डी. घोरपडे लिखित गणराज प्रकाशन प्रकाशित ‘भारतीय संस्कृतीचा इतिहास’ या ग्रंथात उमटले आहे. विश्‍वाला कवेत घेणारे आत्मज्ञान या ग्रंथातून वाचकांसमोर येते, असे प्रतिपादन 81 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (पुणे) अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.


कै. सौ. मंगलाताई घोरपडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त लेखक ॲड. डी.डी. घोरपडे लिखित व गणराज प्रकाशन प्रकाशित ‘भारतीय संस्कृतीचा इतिहास’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील चेतना लॉन येथे पार पडला. संत साहित्याचे अभ्यासक सद्गुरू साहेबराव आवारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वेदशास्त्रमूर्ती ह.भ.प. अभिजीत महाराज गोंदिकर, खासदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार पांडुरंग अभंग, साहित्यिक प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, गणराज प्रकाशनाचे प्रकाशक गणेश भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेंद्र नागवडे, देशमुख देसाई, शुभांगीताई पाटील, दादाभाऊ चितळकर, दादासाहेब जगताप, बाबासाहेब भोस, सतीश पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक कोठारी, ॲड. अविनाश घोरपडे, ॲड. प्रवीण घोरपडे, अर्चना देशमुख, भानुदास घोरपडे आदी उपस्थित होते.


डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, अणुबॉम्बच्या विनाशकारी शक्तीमुळे संपूर्ण मानवजात भयभीत आहे. चीन, रशिया आणि अमेरिका यांसारख्या महाशक्ती देखील शांततेसाठी एकत्र येऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत भारताची भूमी ही आश्रय, श्रद्धा आणि आध्यात्मिक विचारांची भूमी म्हणून जगासमोर उभी राहते. भारतीय विचारधारा मानवतेला एकत्र आणण्याचे आणि विश्‍वशांतीचा मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य बाळगते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केवळ इतिहास जाणून घेण्यासाठी नसून, वर्तमानातील संघर्ष समजून घेऊन भविष्याला योग्य दिशा देण्यासाठीही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.


भारतीय संस्कृती ही विविध विचारधारा आणि तत्त्वज्ञानांना सामावून घेणारी व्यापक जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी केले. ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा इतिहास समजून घेताना केवळ राजे, राजवटी, युद्धे आणि सत्तांतरांचा विचार करून चालत नाही, तर या भूमीत विकसित झालेल्या वैचारिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरांचाही अभ्यास करावा लागतो. वेद, उपनिषदे, संत साहित्य आणि विविध संप्रदायांनी भारतीय समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्षीय भाषणात सद्गुरू साहेबराव आवारे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे खरे सामर्थ्य तिच्या अध्यात्मिक परंपरेत, संत विचारांत आणि सर्वसमावेशक जीवनदृष्टीत आहे. भारतीय संतांनी केवळ भक्तिमार्ग सांगितला नाही, तर समाजाला समता, मानवता, प्रेम आणि सदाचाराचा संदेश दिला. वेद-उपनिषदांपासून संत साहित्यापर्यंतचा प्रवास हा माणसाला स्वतःची ओळख करून देणारा आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ह.भ.प. अभिजीत महाराज गोंदिकर म्हणाले की, आई-वडील आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि त्यागाची खरी किंमत जाणवते. ते जवळ असताना त्यांच्या मायेचे महत्त्व अनेकदा लक्षात येत नाही; मात्र त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांच्या स्थानाची जाणीव करून देते. भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना ईश्‍वराचे स्थान देण्यात आले आहे. कै. मंगलाताई घोरपडे यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन होणे ही विशेष अर्थपूर्ण बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात लेखक ॲड. डी.डी. घोरपडे यांनी पत्नी कै. मंगलाताई यांच्या निधनाने निर्माण झालेल्या दुःखाला उजाळा देत त्यांच्या सहजीवनातील आठवणी आणि जीवनप्रवास उलगडला. पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ज्ञानसंस्कृतीचा वारसा पुढे नेणारा ग्रंथ प्रकाशित होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी त्यांचे ‘अमृत साधना’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले असून, ‘भारतीय संस्कृतीचा इतिहास’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ आहे.


या ग्रंथामध्ये सिंधू संस्कृतीपासून भागवत धर्मापर्यंतचा भारतीय संस्कृतीचा वैचारिक आणि आध्यात्मिक प्रवास मांडण्यात आला आहे. वेद, उपनिषदे, संत साहित्य तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. तब्बल 18 संप्रदाय, पंथ आणि धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा वेध घेताना मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. गणराज प्रकाशनाचे हे 224 वे पुस्तक असून, प्रकाशक गणेश भगत यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनातून साहित्यविश्‍वात आणखी एका महत्त्वपूर्ण वैचारिक साहित्यकृतीची भर पडल्याचे सांगितले. आभार नितीन देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *