• Sun. Nov 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

महात्मा फुलेंची पुण्यतिथी ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी करा!; फुले ब्रिगेडची मागणी

ByMirror

Nov 28, 2026
फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन


महात्मा फुलेंनी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत शिक्षणाची ज्योत पेटवून समाजात ज्ञानक्रांती घडवली -दीपक खेडकर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा वेस येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचा दिवस राज्यभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव त्यांच्या स्मृतिदिनी शिक्षक दिन साजरा करून व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


या अभिवादन कार्यक्रमास महापौर ज्योतीताई गाडे, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, प्रा. माणिक विधाते, किरण जावळे, संतोष हजारे, किरण मेहेत्रे, आकाश डागवाले, अशोकराव तुपे, मळू गाडळकर, गणेश जाधव, महेश गाडे, महेश सूडके, भावेश जाधव, संकेत लोंढे, किरण पंधाडे, शिवम भंडारी, स्वप्नील पडोळे, शैलेश सत्रे, विश्‍वास शिंदे, ब्रिजेश ताठे, निखिल ताठे, अतुल पडोळे, भाऊसाहेब शिंदे आदींसह फुले ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत शिक्षणाची ज्योत पेटवून समाजात ज्ञानक्रांती घडवून आणली. तत्कालीन रूढी-परंपरा, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेला आव्हान देत त्यांनी वंचित आणि महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. स्त्री शिक्षणाचा पाया रचून त्यांनी महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आज समाजात शिक्षणाचा प्रसार झाला असून, त्यामध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा वाटा आहे.


महात्मा फुले यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास त्यांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत होईल. शिक्षक, विद्यार्थी आणि समाजाला त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल. हीच या महापुरुषाला खरी आदरांजली ठरेल. त्यामुळे राज्य सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला शिक्षक दिन म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी दीपक खेडकर यांनी फुले ब्रिगेडच्या वतीने केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *