क्रांतीज्योती सावित्रीबाई-महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन
स्वच्छता, मंडप व माईक व्यवस्थेची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- थोर समाजसुधारक, सत्यशोधक विचारांचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, दि. 28 नोव्हेंबर 2026 रोजी माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई-महात्मा ज्योतिराव फुले कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पंडित खरपुडे आणि ऋषिकेश चव्हाण यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महात्मा ज्योतिबा फुले यांची 28 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असून, या दिवशी शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक माळीवाडा वेशीवरील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुतळा परिसराची स्वच्छता करून तेथे मंडप उभारावा, तसेच अभिवादन कार्यक्रमासाठी माईक व ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करावी, अशी मागणी समितीने निवेदनातून केली आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीनेही अधिकृतरीत्या पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात यावे, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा जागर आणि कार्याचे स्मरण करण्यासाठी पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यतिथीच्या दिवशी शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे. पुतळा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे, मंडप उभारणे आणि माईक व्यवस्था उपलब्ध करून देणे या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

