पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी अन् संगीताचा ठेका; वंचित मुलांची दिवाळी झाली गोड!
दुष्काळाचे सावट झुगारून मुलांच्या आग्रहाखातर स्नेहालयात दीपोत्सव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वंचित घटकातील मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवून त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर व लिओ क्लबच्या वतीने सलग 19 व्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा प्रकाश, फटाक्यांची आतषबाजी आणि संगीताच्या तालावर धरलेला ठेका अशा उत्साहपूर्ण वातावरणात वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद मनमुराद लुटला. या दीपोत्सवात स्नेहालयासह शहरातील आरएचईबी, बालभवन, बाबावाडी, बालगृह प्रकल्प, आनंद प्रेम संस्था, मानस ग्राम प्रकल्प, हिम्मत ग्राम प्रकल्प, बालगृह टाकळी आणि शासकीय बालगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वंचित घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, त्यांनाही सणाचा आनंद घेता यावा आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी करावी, या सामाजिक भावनेतून लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी या दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुलांनी दीपोत्सव साजरा करण्याचा आग्रह धरल्याने त्यांच्या आनंदासाठी यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. एस.एस. दीपक आणि उद्योजक बाबूशेठ बोरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, सचिव हरीश हरवानी, खजिनदार विजय कुलकर्णी, लिओ अध्यक्ष हर्षवर्धन किथानी, लिओ सचिव रीत जाजू, ॲड. अनुराधा येवले, अशलता मुंडा, परमिका शेट्टी, संजीवनी गायकवाड, प्रशांत गायकवाड, प्रकल्प प्रमुख दिलीप कुलकर्णी, डॉ. अमित बडवे, प्रिया मुनोत, गुरनूरसिंग वाधवा, दिशा दोडेजा, स्नेहालयाचे डॉ. प्रा. गिरीश कुलकर्णी, हनीफ शेख, सपना असावा, लायन्सचे धनंजय भंडारे, प्रशांत मुनोत, डॉ. सिमरनकौर वाधवा, सुमित लोढा, संदेश कटारिया, अंजली कुलकर्णी, जपज्योतसिंग बग्गा आदींसह लायन्स सदस्य, लिओ सदस्य, गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य आणि स्नेहालय परिवारातील सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजीतसिंह वाधवा म्हणाले की, वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या दीपोत्सवाचे 19 वे वर्ष आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केवळ मुलांच्या आग्रहास्तव हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. कोरोना काळातही मुलांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. या उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे. लायन्स क्लबमधील प्रत्येक सदस्य सेवाभावाने स्वतःला झोकून देऊन समाज घडविण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. एस.एस. दीपक यांनी मुलांशी संवाद साधताना जीवनात पुढे जाण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. नेहमी खरे बोलावे, नियमित व्यायाम करावा आणि व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
उद्योजक बाबूशेठ बोरा म्हणाले की, आई-वडिलांचा तसेच गुरुजनांचा नेहमी सन्मान व आदर करावा. संस्कारांसोबत शिक्षण आत्मसात केल्यास प्रत्येकाला प्रगतीचा मार्ग सापडू शकतो. संस्कारातूनच देश घडणार आहे. त्यामुळे मोठे झाल्यानंतर प्रत्येकाने देश आणि समाजासाठी आपले योगदान देण्याचे सांगितले.
मोहनशेठ मानधना यांनी फोनवर मुलांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. ॲड. अनुराधा येवले यांनी लायन्स क्लबच्या सदस्यांचे कौतुक करताना सांगितले की, लायन्सचे सदस्य मोठ्या तळमळीने दरवर्षी हा दिवाळी मेळावा साजरा करतात. हा उपक्रम त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असल्याचे स्पष्ट केले.
दीपोत्सवाच्या प्रारंभी स्नेहालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम रंगात आल्यानंतर डीजेच्या तालावर बालगोपालांसह उपस्थित पाहुण्यांनीही हिंदी-मराठी गीतांवर ठेका धरला. अजितसिंग वाधवा यांच्या ‘ट्रिल कलेक्टिव्ह’ ऑर्केस्ट्राचे विशेष सादरीकरण झाले. त्यांनी सहकलाकारांसह बहारदार हिंदी आणि मराठी गीते सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
या मेळाव्यात मुलींनी हातावर मेहंदी काढून घेतली, तर मुलांनी टॅटू काढण्याचा आनंद लुटला. विविध मनोरंजक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी ‘ द ग्रेट ग्रँड सुपर हिरो एलियनचे आगमन’ हा चित्रपट दाखविण्यात आले. त्यामुळे मुलांच्या उत्साहात आणखी भर पडली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘जोडो जोडो भारत जोडो… नफरत छोडो, भारत जोडो…’ अशा घोषणा देत एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश दिला.
सायंकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या असंख्य पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत प्रकाशमय झाला. संगीत, नृत्य, खेळ आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुलांनी दिवाळीचा अविस्मरणीय आनंद अनुभवला. या धमालमय सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वडा-पाव, विविध खाऊ, चॉकलेट, आईस्क्रीम तसेच भोजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली क्षीरसागर आणि रुपेश पुष्पाळ यांनी केले, तर डॉ. अमित बडवे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील छाजेड, किरण भंडारी, कमलेश भंडारी, अरविंद पारगावकर, किशोर रंगलाणी, सतीश बजाज, डॉ. संजय आसनानी, साधना कोठारी आदींसह गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान, स्नेहालय परिवार, बालभवन आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

