• Mon. Nov 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

खासगीकरणाच्या धोरणाविरोधात पाटबंधारे कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने

ByMirror

Nov 23, 2026
जलसंपदा विभागातील 16 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार!

जलसंपदा विभागातील 16 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार!


सुधारित आकृतिबंध रद्द करण्याची मागणी; सरकारी नोकऱ्या संपवून खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या जलसंपदा (पाटबंधारे) विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आकृतिबंधामुळे राज्यातील सुमारे 16 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. महत्त्वाची शासकीय पदे मृत संवर्ग (डेड कॅडर) म्हणून घोषित करून आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून बाह्य यंत्रणेकडून कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचे धोरण राबविले जात असल्याने शासकीय सेवांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) महापालिकेसमोरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. शासनाने लादलेला बेकायदेशीर सुधारित आकृतिबंध तातडीने रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


या आंदोलनात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सचिव रावसाहेब निमसे, भाऊसाहेब शिंदे, वैशाली बोडखे, किशोर गांगर्डे, विजय तोडमल, प्रीती पंडित, पल्लवी सोनवणे, मृदुला भोर, अश्‍विनी कचरे, सोमनाथ पोटे, सोनाली जगधने यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जलसंपदा विभागाने दि. 19 नोव्हेंबर 2026 रोजी आस्थापनेचा सुधारित आकृतिबंध जाहीर केला आहे. यामध्ये खात्यांतर्गत कार्यरत असलेली कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, संगणक चालक, वाहनचालक, अनुरेखक, सहायक आरेखक, परिचर, भांडारपाल, सहायक भांडारपाल आदी महत्त्वाची पदे मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही पदे दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी अत्यंत आवश्‍यक असतानाही ती कायमस्वरूपी कमी करण्याच्या निर्णयामुळे सध्या या पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास 16 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


विभागातील महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास उर्वरित नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार आहे. सध्या अनेक कर्मचारी सांभाळत असलेली प्रशासकीय आणि तांत्रिक कामे मर्यादित मनुष्यबळावर पूर्ण करावी लागतील. त्यामुळे शासनाची तसेच सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करणे कठीण होणार आहे. याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांना भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होण्यावरही मर्यादा येणार आहेत. परिणामी, ज्या पदावर मूळ नियुक्ती झाली आहे, त्याच पदावरून सेवानिवृत्त होण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे.


सिंचन व्यवस्थापनाच्या कामकाजातही मोठ्या प्रमाणात पदकपात करण्यात आली आहे. सिंचन शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या 14 वरून केवळ चार करण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापन, पाणीवाटप आणि पाणीपट्टी वसुली यांसारखी महत्त्वाची कामे अत्यल्प मनुष्यबळावर कशी पार पाडली जाणार, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. याचा परिणाम सिंचन व्यवस्थापनावर होण्याबरोबरच पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण कमी होऊन शासनाच्या महसुलातही मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे कर्मचारी संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.


सुधारित आकृतिबंधात अनेक संवर्ग अतिरिक्त ठरविण्यात आल्याने संबंधित कामांसाठी आवश्‍यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाचे सेवा प्रवेश नियम तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू असणारी इतर बंधने लागू नसतील. त्यामुळे शासकीय कामकाजात अनियमितता आणि विस्कळीतपणा निर्माण होण्याची शक्यता आहे.


आऊटसोर्सिंगच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे शासकीय सेवांचे खासगीकरण केले जात असून, भविष्यात संपूर्ण शासकीय यंत्रणा खासगी संस्थांच्या नियंत्रणाखाली जाण्याचा धोका असल्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. बाह्य यंत्रणेमार्फत मर्जीतील व्यक्तींना अल्प वेतनावर नियुक्त करून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने कामे करून घेण्याची प्रथा सुरू होऊ शकते. त्यामुळे शासकीय सेवांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कामकाजाची गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.


शासनाच्या या निर्णयामुळे सुमारे 15 ते 20 हजार नियमित पदे कायमस्वरूपी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, भविष्यात या पदांवर नव्याने भरती होण्याचे मार्ग बंद होतील. त्यामुळे सुशिक्षित तरुणांसाठी उपलब्ध होणाऱ्या शासकीय नोकरीच्या संधी कमी होऊन बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर होऊ शकतो. आधीच बेरोजगारीचा सामना करणाऱ्या तरुणांमध्ये यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आणि खासगीकरणाला प्रोत्साहन देणारे हे धोरण म्हणजे कर्मचाऱ्यांना वेठबिगारीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न असल्याची टीका राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केली आहे. या धोरणाला संघटनेचा तीव्र विरोध असून, सुधारित आकृतिबंध तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे नियमित पदे कायम ठेवावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


शासनाने कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा, शासकीय विभागांच्या कार्यक्षमतेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा खासगीकरणाच्या या धोरणाविरोधात राज्यभर तीव्र संघर्ष उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *