• Mon. Nov 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगवर गुलमोहर चॅलेंजर्सचे निर्विवाद वर्चस्व; टायब्रेकरमध्ये पटकाविले विजेतेपद!

ByMirror

Nov 23, 2026
अंतिम सामन्यात रंगला फुटबॉलचा थरार! एक्सलन्स अचिव्हर्सला नमवत गुलमोहर चॅलेंजर्स ठरले सुपर लीगचे विजेते

अंतिम सामन्यात रंगला फुटबॉलचा थरार! एक्सलन्स अचिव्हर्सला नमवत गुलमोहर चॅलेंजर्स ठरले सुपर लीगचे विजेते


साईदीप भगत ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू; पुण्यातील नामांकित क्लबच्या निवड समितीकडून गुणवंत खेळाडूंची होणार निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)-  मैदानावरील आक्रमक खेळ, गोल करण्यासाठी खेळाडूंमध्ये सुरू असलेली चढाओढ आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा फुटबॉलमय वातावरणात रंगलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग (ए.एफ.एस.एल.) 2026 च्या पाचव्या पर्वावर गुलमोहर चॅलेंजर्स संघाने विजेतेपदाची मोहोर उमटविली. अंतिम सामन्यात एक्सलन्स अचिव्हर्स आणि गुलमोहर चॅलेंजर्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये अचूक गोल करत गुलमोहर चॅलेंजर्सने विजेतेपद पटकाविले. एक्सलन्स अचिव्हर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


नगर क्लबच्या मैदानावर नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील फुटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सामने रंगले. खेळाडूंच्या वेगवान चाली, अचूक पासिंग, आक्रमक चढाया आणि गोलरक्षणाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मैदानावर फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. फुटबॉलप्रेमी, पालक आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.


साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एक्सलन्स अचिव्हर्स आणि गुलमोहर चॅलेंजर्स या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या हाफमध्ये एक्सलन्स अचिव्हर्सकडून कबीर गोखलानी याने शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, गुलमोहर चॅलेंजर्सकडून आयुष गुंड याने अचूक गोल करत सामन्यात बरोबरी साधली.


पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिल्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. मात्र, गोलरक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल होऊ दिले नाहीत. अखेर निर्धारित वेळ संपेपर्यंत सामन्याचा निकाल 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे विजेता निश्‍चित करण्यासाठी टायब्रेकरचा आधार घेण्यात आला. यामध्ये गुलमोहर चॅलेंजर्सच्या खेळाडूंनी अचूक गोल नोंदवत विजेतेपदावर नाव कोरले. विजय निश्‍चित होताच गुलमोहर चॅलेंजर्सच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.


स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात नमोह फुटबॉल क्लबच्या ओनर नमिता फिरोदिया यांच्या हस्ते विजेत्या गुलमोहर चॅलेंजर्स संघातील खेळाडूंना चषक, पदके आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिटी एफसी पुणेचे शशांक कर्णिक व पुणे पायोनियरचे रेयान शहा यांच्यासह विविध संघांचे मालक व प्रतिनिधी, खेळाडू, प्रशिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविजेता एक्सलन्स अचिव्हर्स संघातील खेळाडूंनाही सन्मानचिन्ह, पदके आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी नमिता फिरोदिया म्हणाल्या की, अहिल्यानगर शहरातून उत्कृष्ट फुटबॉलपटू घडविण्यासाठी नमोह फुटबॉल क्लब विशेष योगदान देत आहे. खेळाडूंना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे क्रीडा क्षेत्रातील करिअर घडविण्याच्या उद्देशाने क्लब कार्यरत आहे. ही स्पर्धा केवळ शहर पातळीवरील आयोजन न राहता, त्यातून निवड होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना पुण्यातील व्यावसायिक फुटबॉल संघांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यांना अनुभवी प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील नामांकित सिटी पुणे फुटबॉल क्लब आणि पुणे पायोनिअर्स फुटबॉल क्लबचे निवड समिती सदस्य उपस्थित होते. त्यांनी दोन दिवस खेळाडूंच्या खेळाचे, तांत्रिक कौशल्याचे, मैदानावरील चपळाईचे आणि कामगिरीचे निरीक्षण केले. या निरीक्षणातून उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना संबंधित क्लबच्या संघात स्थान मिळविण्याची तसेच व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील उदयोन्मुख फुटबॉलपटूंना शहराबाहेरील मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.


स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्येही खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप उमटविली. बेस्ट गोलकिपर म्हणून दक्ष कुलकर्णी, बेस्ट डिफेंडर म्हणून सोहेल खान आणि टॉप स्कोअर म्हणून कबीर गोखलानी यांची निवड करण्यात आली. या तिन्ही खेळाडूंना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक सन्मान असलेला ‘बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार साईदीप भगत याला प्रदान करण्यात आला. त्याला चषक आणि प्रमाणपत्रासह शिवम सायकलच्या वतीने सायकल भेट देण्यात आली.


यंदाच्या स्पर्धेत एमडी अँड आरडीएक्स इन्फ्रा, गुलमोहर चॅलेंजर्स, गांधी वॉरियर्स, डायनामिक स्ट्रायकर, एक्सलन्स अचिव्हर्स, विद्यादान अल्फा एक्स, डॉक्टर बायो आणि नवा मराठा योद्धा या आठ संघांनी विजेतेपदासाठी सहभाग घेतला होता. या संघांचे मालक म्हणून ऋत्विक वाबळे, जोएब खान, चेतन गांधी, सिद्धार्थ मुनोत, आशिष ट्ट्टू, रोहित रामदिन, सचिन सोलाट, ॲड. ललित गुंदेचा, अभिनंदन आणि रुही भन्साळी यांनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेच्या आयोजनासाठी अभिनंदन आणि रुही भन्साळी (अवित्री मोशन) यांचे को-पॉवर म्हणून सहकार्य लाभले. राजेश भंडारी (महावीर ग्रुप) हे किट स्पॉन्सर, तर प्रणिल मुनोत (कॉनप्लेक्स) हे को-स्पॉन्सर होते. याशिवाय राम एजन्सी, शिवम सायकल, फन्की लॅण्ड, अमित ट्रेडर्स, जलाराम फुड्स आणि खेलोफाय यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *