• Thu. Nov 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

जालिंदर बोरुडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान; नेत्रसेवेच्या 35 वर्षांच्या सेवाकार्याचा गौरव

ByMirror

Nov 19, 2026

सेवेच्या प्रकाशाने अनेकांच्या आयुष्यात उजेड; दिल्लीच्या अचिव्हर अवॉर्ड कौन्सिलने घेतली दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या 35 वर्षांपासून नेत्रसेवेच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांच्या जीवनात नवदृष्टीचा प्रकाश निर्माण करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील अचिव्हर अवॉर्ड कौन्सिलच्या वतीने त्यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानाची माहिती कौन्सिलचे चेअरमन डॉ. एस. एन. उपाधी आणि सेक्रेटरी सी. एन. सिन्हा यांनी दिली.


दिल्ली येथील अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे (MCA) नोंदणीकृत संस्था असून, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. संस्थेच्या मूल्यांकन मंडळ, संचालक मंडळ आणि अध्यक्षांच्या समितीने जालिंदर बोरुडे यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याची माहिती व त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करून त्यांची या मानाच्या पदवीसाठी निवड केली.


जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 35 वर्षांपासून अविरतपणे नेत्रसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे नेत्रोपचार घेणे शक्य नसलेल्या गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, या उदात्त हेतूने त्यांनी स्वखर्चाने तसेच विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने राज्यातील अनेक भागांत मोफत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांमध्ये शेकडो नव्हे, तर हजारो गरजू रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना आवश्‍यक उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. मोतिबिंदूचे निदान झालेल्या अनेक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.


नेत्रसेवेच्या माध्यमातून केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता समाजात नेत्रदान आणि अवयवदानाविषयी जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही बोरुडे यांनी हाती घेतले आहे. मृत्यूनंतरही आपले डोळे आणि अवयव इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतात, हा मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, तर अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हा संदेश विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दिला जात आहे.


फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान, अवयवदान जनजागृतीसोबतच समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देणारे विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात. सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून बोरुडे यांनी आपले कार्य सातत्याने पुढे नेले आहे. प्रसिद्धी किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता गरजूंच्या जीवनात आनंद आणि आशेचा प्रकाश निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला आहे.


समाजातील गरजू रुग्णांना दृष्टी देण्यापासून ते नेत्रदान व अवयवदानाचा विचार जनमानसात रुजविण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रदीर्घ प्रवासाची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. जालिंदर बोरुडे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *