लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगरचा 19 वा दिवाळी मेळावा
गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानचे सहकार्य
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वंचित व गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी 19 व्या दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा आनंद सोहळा शनिवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता स्नेहालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभणार आहे. सर्व नागरिकांना या आनंदसोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष हरजितसिंग वधवा, सचिव हरीश हरवानी, खजिनदार विजय कुलकर्णी आणि लिओ अध्यक्ष हर्ष किथानी यांनी केले आहे.
या दिवाळी मेळाव्यामध्ये मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. फन फेअर, बुढ्ढी के बाल, मिनी ट्रेन, फुगे, जंपिंग, विविध खेळ, मेहंदी, रांगोळी तसेच आकर्षक ऑर्केस्ट्रा आणि डीजे यांचा आनंद मुलांना घेता येणार आहे. लिओ क्लबच्या सदस्यांकडून विशेष खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहार व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे प्रकल्प अध्यक्ष म्हणून दिलीप कुलकर्णी, प्रिया मुनोत, डॉ. अमित बडवे आणि गुरनूरसिंग वधवा जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एस. दीपक, मोहनशेठ मानधना, सिमरतलाल बोरा आणि शरदभाऊ मुनोत उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील छाजेड, किरण भंडारी, कमलेश भंडारी, प्रशांत मुनोत, धनंजय भंडारे, अरविंद पारगावकर, डॉ. संजय असनानी, संतोष माणकेश्वर, योगेश भंडारी, संदेश कटारिया, सीए शंकर अंदानी, सुमित लोढा, तसेच लिओ ओम भंडारी आणि जपज्योत बग्गा प्रयत्नशील आहेत.
गेली 19 वर्षे सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि आनंद वाटण्याच्या भावनेचा सुंदर उत्सव ठरत आहे. वंचित व गरजू मुलांना दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

