जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान
विखे यांच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला आर्थिक बळ मिळणार -गणेश बनकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. विखे पाटील यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के, नगरसेवक दत्ता गाडळकर, निखिल वारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, अनिल गदादे यांच्यासह भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट तसेच स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या घटकांना कर्ज मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी विखे कुटुंबीयांची शेतकरी वर्गाशी असलेली नाळ अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्नांची त्यांना जाणीव असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनीही डॉ. सुजय विखे पाटील यांच्या चेअरमनपदाच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला आर्थिक बळ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठीही जिल्हा बँकेच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, असे त्यांनी नमूद केले.

