‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणांनी भिंगार दुमदुमले!
भिंगार राष्ट्रवादीकडून स्मृतींना उजाळा!; पाडव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जागवल्या जुन्या आठवणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडवा म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा दिवस. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर अजितदादा आवर्जून कार्यकर्त्यांची भेट घेत, त्यांची आस्थेने विचारपूस करत आणि आपुलकीचा संवाद साधत असत. कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि त्यांच्यावरील प्रेम यामुळे पाडव्याचा दिवस कार्यकर्त्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरत असे. मात्र, यंदाचा दिवाळी पाडवा त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होत असताना कार्यकर्त्यांच्या मनात आठवणींचा कढ दाटून आला. याच भावनेतून भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, श्यामराव वागस्कर, अनिल तेजी, दीपक लिपाने, रवी लालबोंद्रे, संपत बेरड, रवी नामदे, सागर चवंडके, दिनेश लंगोटे, संकेत झोडगे, निखिल शिंदे, कैलास वाघस्कर, रमेश वराडे, संजय भिंगारदिवे, करण पाटील, अरुण चव्हाण, ॲड. साहेबराव चौधरी, मळुराज गाडेकर, विनोद वाघस्कर, जय वाघस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणजे कार्यकर्त्यांना आपलेसे करणारे नेतृत्व. राजकीय व्यस्ततेतही कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, सुख-दुःखात सहभागी होणे आणि प्रत्येकाला आपुलकीची वागणूक देणे ही त्यांची खास ओळख होती. दिवाळी पाडव्याच्या दिवशी कार्यकर्त्यांची भेट घेण्याची त्यांची परंपरा अनेकांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या पाडव्याला त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला चटका लावणारी ठरली.
नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारे, आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि कामाच्या धडाडीने वेगळी ओळख निर्माण करणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांनी निर्माण केलेली नाती, दिलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांवर केलेले प्रेम कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
आठवणींचा दीप सदैव तेवत राहील! माणसं काळाच्या पडद्याआड जातात; मात्र त्यांनी निर्माण केलेली नाती, दिलेले विचार आणि केलेले कार्य कधीच विसरता येत नाही. अजितदादांचे नेतृत्व, त्यांची कार्यशैली, कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि त्यांच्या आठवणी पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. पाडव्याच्या या अभिवादन कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याप्रती भावना व्यक्त केल्या.
भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणारे आणि कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे नेतृत्व होते. त्यांच्या राजकीय जीवनात शिस्त, स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि विकासकामांचा ध्यास या गुणांना विशेष महत्त्व होते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची त्यांची परंपरा आजही आठवणींमध्ये जिवंत असल्याचे ते म्हणाले.
युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी म्हणाले की, स्व. अजित पवार यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, कष्ट, लोकसेवा आणि विकासाच्या ध्यासाने प्रेरित होते. तरुणांना संधी देणे, नव्या पिढीला प्रोत्साहन देणे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या कामाचा वेग, निर्णय घेण्याची क्षमता आणि जनतेच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आज अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्यशैली आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आमच्या मनात कायम राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

