• Fri. Oct 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

शालेय स्वच्छता हा संस्कार; तो रोजच जपला पाहिजे! – विजय बेरड

ByMirror

Oct 23, 2026
ॲबट संकुलात स्वच्छता अभियान

ॲबट संकुलात स्वच्छता अभियान


तीन एकरांचा शालेय परिसर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केला चकाचक!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शाळा ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र असून, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविणे ही काळाची गरज आहे. घराप्रमाणेच शाळा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणेही स्वच्छ ठेवली पाहिजेत. स्वच्छता हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि संस्कारांचा भाग बनला पाहिजे. त्यामुळे भिंगार येथील ॲबट शैक्षणिक संकुलाने राबविलेले संपूर्ण विद्यालय स्वच्छता अभियान कौतुकास्पद असून, असे अभियान दररोज राबवून शाळेचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा , उद्योजक तथा स्कूल कमिटीचे सदस्य (प्राथमिक विभाग) सदस्य इंजि.विजय बेरड यांनी व्यक्त केली.


श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदत्ताशाह हायस्कूल व विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण विद्यालय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यालयाचा संपूर्ण परिसर, मैदान आणि शालेय इमारतीची स्वच्छता करण्यात आली. सुमारे तीन एकर परिसरात विस्तारलेल्या या विद्यालयातील प्रत्येक भाग स्वच्छ करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ व चकाचक केला.


या उपक्रमाचे कौतुक करताना विजय बेरड म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला आपले घर स्वच्छ असावे, असे वाटते. मात्र, घराबरोबरच शाळा, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. शाळेतील स्वच्छता ही विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावणारी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेत ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावे. शाळा केवळ स्वच्छता अभियानाच्या दिवशीच नव्हे, तर दररोज स्वच्छ दिसली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.


या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेल्या श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले. यावेळी माजी रयत सेवक पाराजी भांड आणि सामाजिक कार्यकर्ते इंजि.विजय बेरड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्वर संदीप यांनी केले, तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण अनभुले यांनी आभार मानले.


या स्वच्छता अभियानात प्राचार्य, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, माध्यमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून विद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *