• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘ज्ञानेशकुमार मामू, लवकर चांगले व्हा अन्‌ राजीनामा द्या!’

ByMirror

Oct 18, 2026
रिपाइं (गवई) कार्यकर्त्यांकडून शेकडो पत्रे भारत निर्वाचन आयोगाला;

रिपाइं (गवई) कार्यकर्त्यांकडून शेकडो पत्रे भारत निर्वाचन आयोगाला;


एसआयआरविरोध आणि ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी साखळी उपोषणाचा नववा दिवस


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ‘ज्ञानेशकुमार मामू, लवकर चांगले व्हा आणि राजीनामा द्या…’ अशा आशयाची शेकडो पत्रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर येथून भारत निर्वाचन आयोगाला पाठविली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) रद्द करावी, या मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने शहरात साखळी उपोषण सुरू आहे. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचा शनिवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी नववा दिवस होता. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाने या प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता आला पाहिजे. त्यासाठी मतदार यादी तयार करण्यापासून ते तिच्या पुनरीक्षणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.


या साखळी उपोषणात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, नईम शेख, गुलाम शेख, विजय शिरसाठ, संजय कांबळे, शेखर पंचमुख, अजीम खान, शुभम ठोंबे, लकी वाघमारे, जमीर शेख, अरबाज शेख, अजीज शेख, जावेद सय्यद, सुफीयान शेख, प्रकाश थोरात, इरफान शेख, गजफर शेख, ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, शीतल नाटिकर, प्रियंका पठारे, रेश्‍मा जाधव, विश्रांती पठारे आदी सहभागी झाले होते.


मतदार यादीच्या पुनरीक्षणादरम्यान कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव चुकीने वगळले जाऊ नये. तसेच नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आणि आवश्‍यक दुरुस्त्या करून घेण्यासाठी पुरेशी संधी मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेल्यास संबंधित नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील कथित अनियमिततांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. एसआयआर प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांची दखल घेऊन ही प्रक्रिया रद्द करावी, अशीही भूमिका मांडली आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मतदार यादीतील कथित अनियमिततांची सखोल चौकशी करावी, या मागण्यांसाठी आंदोलकांनी भारत निर्वाचन आयोगाला शेकडो पत्रे पाठविली. ‘ज्ञानेशकुमार मामू, लवकर चांगले व्हा आणि राजीनामा द्या…’ असा मजकूर असलेल्या या पत्रांद्वारे आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध नोंदविला.


मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदारांचा विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा निष्पक्ष असणे आवश्‍यक आहे. मतदारांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत मागण्यांबाबत योग्य कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *