• Fri. Oct 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

ByMirror

Oct 16, 2026
ग्रामपंचायतमध्ये विविध संस्थांच्या वतीने अभिवादन

ग्रामपंचायतमध्ये विविध संस्थांच्या वतीने अभिवादन


विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा -पै. नाना डोंगरे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती निमगाव वाघा (ता. नगर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी उपस्थितांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे स्मरण केले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ, रामा पवार, सोमनाथ आतकर, रितेश डोंगरे, संदीप डोंगरे, शशिकांत होळकर आदी उपस्थित होते.


डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या आणि जिद्दीच्या बळावर देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली. आपल्या साध्या राहणीमानाने, प्रामाणिक विचारांनी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या विशेष जिव्हाळ्याने त्यांनी देशवासीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनप्रवासातून आजही तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची, ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते.


डॉ. कलाम यांनी आपले संपूर्ण जीवन देशाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. भारताला विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रपतीपदावर कार्यरत असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला आणि तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांची जयंती केवळ अभिवादनाचा दिवस नसून, त्यांच्या विचारांचा स्वीकार करून देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि युवकांना राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी प्रेरित करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *