• Mon. Oct 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्येष्ठ कवयित्री हेमलता गिते यांचा राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने गौरव

ByMirror

Oct 12, 2026
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल

राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मान


साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गिते यांना भारतीय सारस्वत मंडळाच्या वतीने राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील अंधेरी येथे आयोजित राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्रभूषण साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. सौ. सबनीस आणि सौ.सकटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या साहित्य संमेलनाला भारतीय सारस्वत मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी सकट यांच्यासह साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्याचा उत्कर्ष साधणे, भारतीय साहित्यपरंपरेला अधिक बळकटी देणे आणि साहित्यिकांच्या सर्जनशील कार्याला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने भारतीय सारस्वत मंडळ कार्यरत आहे. साहित्यिकांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हा मंडळाच्या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे.


संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणातून सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि साहित्यिकांची वैचारिक जबाबदारी यांवर महत्त्वपूर्ण विचार मांडले. जाती-पातीच्या आधारे समाजात फूट पाडणारे समाजकारण आणि राजकारण हे मानवाच्या प्रगतीतील मोठे अडथळे असल्याचे त्यांनी नमूद केले.


छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारखे राष्ट्रपुरुष कोणत्याही एका जातीचे किंवा समूहाचे नसून ते संपूर्ण देशाचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे महापुरुष प्रत्येकाचे आहेत, त्यांचे विचार सर्वांसाठी आहेत, ही भावना समाजात रुजणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. कवींनी राष्ट्रहिताच्या कविता लिहाव्यात, तसेच सरकार, व्यवस्था, समाज आणि संस्कृती यांना आवश्‍यक ते प्रश्‍न निर्भीडपणे विचारावेत, असे आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले.


हेमलता प्रदीप गिते या मराठी साहित्यविश्‍वात संवेदनशील, अभ्यासू आणि प्रभावी कवयित्री म्हणून परिचित आहेत. आपल्या लेखणीतून त्यांनी विविध सामाजिक, मानवी आणि भावनिक विषयांना सातत्याने अभिव्यक्ती दिली आहे. त्यांच्या कवितांमध्ये मानवी नात्यांतील गुंतागुंत, जीवनातील विविध अनुभव, सामाजिक जाणिवा आणि भावविश्‍वाचे प्रतिबिंब दिसून येते. कवितेच्या माध्यमातून मानवी मनाचा वेध घेताना सामाजिक वास्तवाचे भान जपणे, ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू मानली जाते. त्यांच्या साहित्यामध्ये भावनांची सहजता, आशयाची खोली आणि जीवनाकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन जाणवतो. त्यामुळे त्यांच्या कविता वाचकांबरोबरच श्रोत्यांनाही भावतात. उत्कृष्ट काव्यलेखन, प्रभावी काव्यसादरीकरण आणि ललित साहित्यनिर्मिती या क्षेत्रांतील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात हेमलता गीते यांनी निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘ये तू असा की…’ ही मृत्यूवरील प्रेम कविता सादर केली. त्यांच्या भावपूर्ण आणि प्रभावी काव्यसादरीकरणाने सभागृहातील वातावरण भारावून गेले. उपस्थित रसिकांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सत्रात निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करत त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हेमलता गिते यांना यापूर्वीही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दीडशेहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *