संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण व प्रभागनिहाय कार्यकारिणी गठित करण्याचे आवाहन
शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची जिल्हा आढावा बैठक; अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी बैठक घेणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून स्व. उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हेच विचार घेऊन पक्षाची पुढील वाटचाल सुरू आहे. अल्पसंख्यांक समाजाला शासकीय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे तसेच समाजाचा सन्मान वाढला पाहिजे, यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांचा जिल्हानिहाय राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 8 ऑक्टोबर) अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्न, संघटन बांधणी तसेच पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने झालेल्या या बैठकीत ॲड. नाझेर काझी बोलत होते.
यावेळी दौरा प्रमुख समन्वयक यासिन शेख, प्रदेश उपाध्यक्ष अकरम तेली, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, अब्दुल खोकर, शहानवाज शेख, वसीम शेख, मिजान कुरेशी, शहबाज बॉक्सर, जाकीर शेख, फिरोज पठाण, शाहरुख शेख, फरीद सय्यद, गफ्फार शेख, अन्सार शेख, अफरोज सय्यद, सरफराज कुरेशी आदींसह अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी म्हणाले की, अल्पसंख्यांक विभाग केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित राहणार नसून सर्व अल्पसंख्यांक समाजाला बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. मुस्लिम समाजाचा विकास स्व. अजित पवार यांनी केला. इतर पक्षांनी केवळ भावनात्मक राजकारण करून फक्त त्यांच्या मतांसाठी अल्पसंख्यांक समाजाचा वापर केला.
अहिल्यानगर शहरात गेल्या 11 वर्षांपासून साहेबान जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक विभागाचे उत्तमपणे कार्य सुरू असल्याचे सांगून काझी यांनी ही संघटना आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी ग्रामीण भागासह प्रभागनिहाय कार्यकारिणी गठित करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंदखेड राजा येथून आलेल्या ॲड. नाझेर काझी यांनी त्यांच्या घराण्याचे तसेच राजमाता जिजाऊ यांच्या घराण्याशी असलेले ऐतिहासिक संबंधही यावेळी स्पष्ट केले. ‘संघटना नसेल, तर दखल घेतली जात नाही,’ असे सांगत त्यांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला. अहिल्यानगर शहरात उर्दू घर प्रकल्पाची योजना आणण्याची सूचना त्यांनी केली. या प्रकल्पामध्ये लायब्ररी तसेच अभ्यासिकांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर बैठकीदरम्यान त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांची माहिती जाणून घेतली.
बैठकीच्या प्रास्ताविकात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार म्हणाले की, स्व. उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या निधनानंतर सर्वात जास्त अल्पसंख्यांक समाजाची हानी झाली. अल्पसंख्यांक समाजातील पदाधिकाऱ्यांना राजकीय बळ आणि संधी देण्याची सूचना त्यांनी मांडली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली तरी ती जबाबदारीने पार पाडण्याचे स्पष्ट मत साहेबान जहागीरदार यांनी व्यक्त केले.
प्रदेश उपाध्यक्ष अकरम तेली यांनीही मनोगत व्यक्त केले. अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर विशेष दौरा सुरू असून, अहिल्यानगरकडे विशेष लक्ष देऊन काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान बॉडी बिल्डर मोहसिन शेख यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या हस्ते मोहसिन शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या या बैठकीसाठी शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याबरोबरच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याची दिशा निश्चित करण्यात आली.

