• Wed. Oct 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला सक्षमीकरणाचा जागर करुन प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुपचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात

ByMirror

Oct 6, 2026
विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; गरबा, बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सोहळा

31 वर्षांची सामाजिक वाटचाल; प्रयास-दादी-नानी ग्रुपतर्फे महिलांचा सन्मान आणि विविध उपक्रम


विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; गरबा, बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सोहळा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना आत्मनिर्भर बनविणे आणि सामाजिक क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने गेल्या 31 वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रयास ग्रुप आणि दादी-नानी ग्रुपचा 31 वा वर्धापन दिन महिला शक्तीचा जागर करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विविध बौद्धिक, मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना प्रमुख पाहुण्या पार्वती (काकी) जगताप व माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


अलका मुंदडा यांनी स्थापन केलेल्या प्रयास ग्रुपच्या सामाजिक कार्याला यंदा 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत महिलांच्या आरोग्यापासून त्यांच्या आत्मनिर्भरतेपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक कार्याची जाणीव निर्माण करणे, या उद्देशाने ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या वर्धापन दिन सोहळ्यात ग्रुपच्या कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग देणाऱ्या दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, ॲड. ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा पवार आणि लीला अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरातील विविध उपक्रमांसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या मेघना मुनोत, दीपा मालू आणि दीपा सोनी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष सुचेता बोरकर, सचिव मीनाक्षी पाठक, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, सरस्वती झंवर, सोनाली थोरात, गुंजली खिलारी, सुनिता चक्रवती, सविता धामट, मीरा पाटील, संपुर्णा देशमुख, आरती भुतडा, वैशाली क्षीरसागर, प्रिया गुंदेचा, मुनोत उषा, सोनी नीलिमा पवार, प्रतिभा भिसे, आरती थोरात, सोनी पुरनाळे, संगीता दंडवाणी, सुजाता कदम, सुरेखा जंगम, अरुणा गोयल, अलका वाघ, सुनीता काळे, ॲड. स्वाती जाधव, वैदेही बल्लाळ, प्रिया शिंदे, उज्वला बोगावात, रेखा फिरोदिया, जयश्री पुरोहित, उषा सोनटक्के, शशिकला झरेकर, सुशीला त्र्यंबके, ज्योती गांधी, आशा गायकवाड, दीपा मालू, दीपा सोनी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पार्वती (काकी) जगताप म्हणाल्या की, महिलांनी केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही पुढाकार घेतला पाहिजे. महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि सक्षम कुटुंबातूनच सक्षम समाजाची निर्मिती होते. प्रयास ग्रुप आणि दादी-नानी ग्रुप गेल्या 31 वर्षांपासून महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होतात. या सामाजिक कार्याची वाटचाल भविष्यातही अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्‍वासाने पुढे जाण्याची गरज आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. महिला सक्षमीकरणाची संकल्पना केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविणे आवश्‍यक आहे. प्रयास ग्रुपने गेल्या 31 वर्षांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून हीच भूमिका प्रभावीपणे पुढे नेली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी, आत्मनिर्भरतेसाठी मार्गदर्शन आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, महिलांना एकत्र आणून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे, या उद्देशाने प्रयास ग्रुपची सुरुवात करण्यात आली. गेल्या 31 वर्षांत अनेक महिला या कार्याशी जोडल्या गेल्या. त्यांच्या सहकार्यामुळेच ग्रुपची सामाजिक वाटचाल सातत्याने सुरू राहिली आहे. महिलांच्या आरोग्यापासून मनोरंजनापर्यंत, आत्मनिर्भरतेपासून सामाजिक जाणीव निर्माण करण्यापर्यंत विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काळातही महिलांसाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमात कोरिओग्राफर संकेत वागस्कर यांनी गरबा नृत्याचा आकर्षक डेमो सादर केला. त्यांच्या नृत्य सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर उपस्थित महिलांनीही गरब्याचा मनमुराद आनंद घेतला. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गरब्याच्या तालावर ठेका धरला होता. वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी विविध बौद्धिक तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

खेळांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. याशिवाय सोडत पद्धतीने भाग्यवान विजेत्यांची निवड करून त्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान डॉ. विजय जगताप यांनी बीपी, शुगर आणि त्वचेच्या समस्यांवर गुणकारी असल्याचे सांगितलेल्या अमृत संजीवनी हेल्थ प्रोडक्टची माहिती उपस्थित महिलांना दिली. महिलांनी आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली. पाहुण्यांचे स्वागत जयाताई गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार सचिव मीनाक्षी पाठक यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *