• Tue. Oct 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

52 वर्षांनंतरही मैत्रीचा धागा कायम! अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

ByMirror

Oct 6, 2026
शाळा सुटली, पण मैत्री नाही! 1973-74 च्या मॅट्रिक बॅचचे सवंगडी अर्धशतकानंतर पुन्हा एकत्र

शाळा सुटली, पण मैत्री नाही! 1973-74 च्या मॅट्रिक बॅचचे सवंगडी अर्धशतकानंतर पुन्हा एकत्र


आजोबा झाले, वयाची साठी-सत्तरी ओलांडली; तरी वर्गमित्रांची मैत्री आजही तितकीच घट्ट!; जुन्या आठवणींना उजाळा देत रंगल्या मनमुराद गप्पा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय जीवन संपून तब्बल 52 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला, जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाची वाट वेगळी झाली, अनेकांनी संसार थाटले, मुलांचे संसार पाहिले आणि आता अनेक जण आजोबा झाले; मात्र मैत्रीचे बंध मात्र आजही तितकेच घट्ट आहेत. मराठी मिशनच्या अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या सन 1973-74 च्या मॅट्रिक (इयत्ता अकरावी) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अर्धशतकानंतरही आपला स्नेहबंध जपला आहे. या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा शहरातील एका हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसे एकमेकांच्या संपर्कात येत असली, तरी 52 वर्षांपूर्वी शाळेत एकत्र शिकलेल्या मित्रांनी आपले नाते केवळ संपर्कापुरते मर्यादित न ठेवता ते आजही जिवंत ठेवले आहे. दरवर्षी हे माजी विद्यार्थी एकत्र येतात. उतारवयाकडे वाटचाल सुरू असतानाही शालेय सवंगड्यांमधील जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्रीचा ओलावा कायम असल्याचे या स्नेहमेळाव्यातून पुन्हा एकदा दिसून आले.


या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी जणू पुन्हा एकदा आपला शाळेचा वर्ग भरविला. एकमेकांना भेटताच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेतील गंमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रांसोबत केलेली मस्ती, परीक्षा, खेळ, शाळेतील प्रसंग अशा असंख्य आठवणींना उजाळा देत मित्रांनी मनमुराद गप्पा मारल्या.


वयाची अनेक दशके उलटली असली तरी एकमेकांसमोर येताच शाळेतील तोच उत्साह आणि आपलेपणा अनुभवायला मिळाला. जुन्या आठवणी सांगताना अनेक मित्र भारावून गेले. चांगल्या-वाईट प्रसंगांचा इतिहास सांगताना हास्याचे फवारे उडाले, तर काही आठवणींनी डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे भावनिक चित्रही पाहायला मिळाले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी निधन झालेल्या वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आयुष्याच्या प्रवासात आपल्यातून निघून गेलेल्या सवंगड्यांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित मित्र भावूक झाले. शालेय जीवनातील मैत्री ही केवळ त्या काळापुरती मर्यादित नसून आयुष्यभराची सोबत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्नेहमेळाव्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतूनही माजी विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी एकत्र आले होते. जीवनाच्या प्रवासात अनेक मित्र दूर गेले. नोकरी, व्यवसाय, संसार आणि विविध कारणांमुळे भौगोलिक अंतर वाढले; मात्र वर्गमित्र म्हणून निर्माण झालेले स्नेहबंध हे अंतरही ओलांडून आजपर्यंत कायम राहिले आहेत.


अंतराने कितीही दूर गेलो, तरी वर्गमित्र या नात्याची गोड शिदोरी आयुष्यभर सोबत राहणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शाळेतील मैत्री ही आयुष्यातील सर्वात निरागस आणि निस्वार्थ नातींपैकी एक असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. मुलांचे संसार थाटून, कुटुंबाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता जीवनाच्या उतारवयात प्रवेश केलेल्या या मित्रांना जुन्या सवंगड्यांच्या भेटीतून आनंदाचे क्षण मिळावेत, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होता यावे आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, या उद्देशाने दरवर्षी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते.


आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक नाती दुरावत असताना, 52 वर्षांनंतरही शालेय मित्रांचे नाते जपले जाणे ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या स्नेहमेळाव्यास हिरालाल चेंगेडिया, अनिल औटी, बंडू बनकर, सतीश जाधव, जफर खान, रावसाहेब नेटके, सुधीर नवगिरे, अविनाश रावडे, विजय सात्राळकर, अल्ताफ शेख, शांतीलाल शिंगवी, बाळू शिंदे, रमेश थोरात, सुरेश वाघमारे, बाबा भालेराव, विनीत मकासरे, हबीब पेंटर, सॅम्युअल साळवी, किरण पवार, शशिकांत वाघमारे, चंद्रशेखर जाधव, गंगाराम मगर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल चेंगेडिया यांनी करून ग्रुपच्या वाटचालीची माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांचा परिचय विनीत मकासरे यांनी करून दिला. जफर खान यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल औटी यांनी केले, तर विजय सात्राळकर यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *