• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

बालघरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींची भेट; 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली

ByMirror

Oct 3, 2026
‘शिक्षणाची वाट सोपी व्हावी’ म्हणून सेवाप्रीतचा पुढाकार

वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सेवाप्रीतचा आधार

‘शिक्षणाची वाट सोपी व्हावी’ म्हणून सेवाप्रीतचा पुढाकार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्बल, वंचित व उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील बालघर प्रकल्पातील वंचित व निराधार बालकांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किट भेट देण्यात आली. तसेच शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होणाऱ्या दोन गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.


प्रकल्प प्रमुख निशा धुप्पड यांच्या पुढाकाराने हा सेवाभावी उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साहित्य देणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना शिक्षणासाठी आवश्‍यक साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेत नियमित जाण्यासाठी सायकलची आवश्‍यकता असलेल्या दोन विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठी मदत मिळाली. यावेळी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लिडर अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नय्यर, नताशा धुप्पड, गीता धुप्पड, अर्चना ओबेरॉय, संगीता ॲबट, संगीता जग्गी, बाबो धुप्पड, वीणा खुराणा, रीटा बक्षी, शबनम धुप्पड, प्राची धुप्पड, तक्ष धुप्पड, कमलेश पंजाबी, रेखा वाही आदी महिला सदस्य उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान अधिकार मिळणे आवश्‍यक आहे. परिस्थिती प्रतिकूल असली तरी योग्य वेळी मिळालेली मदत आणि प्रोत्साहन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. वंचित व निराधार बालकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, हीच सामाजिक कार्याची खरी दिशा आहे. सेवाप्रीतच्या माध्यमातून भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


निशा धुप्पड म्हणाल्या की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छा असते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्य किंवा शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता भासते. अशा विद्यार्थ्यांना वेळेवर मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सेवाप्रीतच्या माध्यमातून प्रयत्न सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या उपक्रमादरम्यान 40 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याची भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटले होते. त्यानंतर बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी पावभाजी व पुलावाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा प्रकारे मदतीचा हात देणे आवश्‍यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बालघर प्रकल्पाच्या वतीने सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *