चैताली चौगुलेने पटकाविला प्रथम क्रमांक; हिंदी दिनानिमित्त अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये वक्तृत्वाला चालना
विविध विद्यालयांच्या सहभागाने वाद-विवाद स्पर्धा उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, प्रभावी वक्तृत्वकौशल्य आणि विषयाकडे विविध अंगांनी पाहण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्यवाह अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेला शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या सभागृहात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक व प्रमुख पाहुणे डॉ. पूर्णिमा बेहेरे व रवींद्र चोभे, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, उच्च प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना मुंडिवाले, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यालयाच्या संगीत शिक्षिका रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हिंदी विषयाच्या अध्यापिका उन्नती नगरकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. डॉ. पूर्णिमा बेहेरे यांनी वाद-विवाद स्पर्धेत सहभागी होताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, तसेच आपले विचार प्रभावीपणे कसे मांडावेत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आसिफ शेख यांनी वाद-विवाद स्पर्धेचे नियम व स्पर्धेची माहिती दिली.
‘सामाजिक माध्यम वेदिका विद्यालयीन छात्रो के लिए जरूरी है या नही?’ या विषयावर विविध विद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मते प्रभावीपणे मांडली. सामाजिक माध्यमांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान, त्याचे फायदे-तोटे, शैक्षणिक वापर तसेच त्याचे संभाव्य दुष्परिणाम अशा विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
रवींद्र चोभे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. प्रभावी वक्तव्य करताना विषयाची मांडणी, भाषेचा वापर, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांचा वापर करताना सजग राहण्याची गरज व्यक्त करत त्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली.
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. आसिफ शेख यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. विजेत्या विद्यार्थ्यांचे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, संस्थेचे सदस्य, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती हिंगे यांनी केले, तर अनिता वायकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
–
वाद-विवाद स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
प्रथम- चैताली चौगुले (सेठ नंदलाल धूत विद्यालय), द्वितीय- राधा जाट (पंडित नेहरू हिंदी विद्यालय), तृतीय- आर्यन उगले (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल) उत्तेजनार्थ- वेदांती पालवे (भाऊसाहेब फिरोदिया स्कूल) व शिवानी मोरे (सेठ नंदलाल धूत)

