• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

खडांबे विद्यालयात ‘वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा’ प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ

ByMirror

Oct 3, 2026
रस्ता सुरक्षेसाठी शालेय जीवनापासूनच जनजागृती; ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळणार वाहतूक नियमांचे धडे; खडांबे विद्यालयाचा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणारा उपक्रम


रस्ता सुरक्षेसाठी शालेय जीवनापासूनच जनजागृती; ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रस्ते अपघात टाळण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, या उद्देशाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री शाहू विद्यामंदिर, खडांबे (ता. राहुरी) विद्यालयाच्या वतीने ‘वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक (मार्ग साधना)’ उभारण्यात आला आहे. या प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते करण्यात आला.


अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्‍वस्त जयवंतराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी कृषी भूषण सूरसिंगराव पवार, माजी सभापती बाळासाहेब लटके, माजी सरपंच यशवंतराव ताकटे, आबासाहेब वाघमारे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रभाकर हरिश्‍चंद्रे, प्रगतशील शेतकरी संजय पवार, स्कॉईन लीडर कल्हापुरे, अर्जुनराव लटके, बाळासाहेब जठार, तानाजी पवार, गुलाब पवार, रावसाहेब पवार, विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे, पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे, रावसाहेब खेडकर, लक्ष्मण हरिश्‍चंद्रे, विशाल पारख, नानासाहेब भवार, सुखीशेठ गुगळे, अशोक उंडे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याचा उपक्रम विद्यालयाने हाती घेतला आहे. यासाठी शाळेच्या परिसरात वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक उभारण्यात आला असून, या ट्रॅकवर वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहनात बसवून रस्त्यावर दिसणारी विविध चिन्हे, वाहतूक सिग्नल, किलोमीटरचे अंतर तसेच रस्त्यालगतची गावे यांची माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता वाहतूक नियमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.


यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय जवान व शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणाऱ्या ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या शिल्पामध्ये बैलगाडी आणि त्यामागे प्रगतशील शेतकऱ्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय जवानाचे चित्रही साकारण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी व जवानांविषयी सन्मानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, या शाळेतून शिकलेला विद्यार्थी भविष्यात वाहतुकीचे नियम मोडणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जाणार आहेत. सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे होतात. योग्य वाहतूक नियमांची माहिती असल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. मोपेड व बॅटरीच्या गाड्या आल्याने लहान मुलांच्या हातातही लवकर वाहने येत आहेत. त्यामुळे त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असणे गरजेचे झाले आहे.
‘जय जवान, जय किसान’ शिल्पाच्या माध्यमातून शेतकरी व जवानांचा सन्मान वाढविण्यात येणार आहे. शेती करूनही मोठे व्यावसायिक होता येते. त्यामुळे शेतीला कमी समजू नये. देशसेवेसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान दिले जाते. समाजात मुलांना उभे करण्याचे काम विद्यालयाच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पोलीस निरीक्षक गणेश वारुळे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देणारा हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करा. जीव वाचवण्यासाठी वेळेवर मदत मिळणे आवश्‍यक असते. यासाठी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्या सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार होत असून, याबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी जागृती होणे गरजेचे आहे. मोबाईलचा चांगला उपयोग तसेच त्याचे दुष्परिणाम याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.


पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले की, दररोज अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात आहेत. भारतीय संस्कृतीचे भान ठेवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. 108 व 112 क्रमांक डायल करून रुग्णवाहिका बोलवावी. समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत. चांगल्या सवयी आयुष्य बदलू शकतात. परवाना मिळत नाही तोपर्यंत वाहने चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले. या विद्यालयात मॉडेल पोलीस स्टेशन उभारल्यास पोलिसांचे कार्यही विद्यार्थ्यांना समजू शकणार आहे. यातून चांगले पोलीस अधिकारीही घडतील. यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव वाघ म्हणाले की, विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. वाहतूक नियम हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अचानक अपघात घडतात. त्यासाठी वाहतूक नियम पाळणे आवश्‍यक आहे. लहान वयातच वाहतुकीच्या नियमांची माहिती झाल्यास भविष्यातील अपघात टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कृषी भूषण सूरसिंगराव पवार म्हणाले की, पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यक्षम शिक्षणाची गरज आहे. देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. युवकांना कौशल्यक्षम शिक्षणाचे धडे मिळाल्यास देशाची विकासात्मक दिशेने वाटचाल होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण सुरक्षिततेसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब लटके व बाळासाहेब जठार यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम कोरडे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *