• Tue. Sep 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरात भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला भटक्या-विमुक्त समाजाचा प्रतिसाद

ByMirror

Sep 29, 2026
जात प्रमाणपत्रासह आधार, मतदार ओळखपत्र विविध दाखल्यांची झाली सोय

जात प्रमाणपत्रासह आधार, मतदार ओळखपत्र विविध दाखल्यांची झाली सोय


कागदपत्रांच्या अभावामुळे योजनांपासून वंचित राहू नये यासाठी राबविले विशेष अभियान; कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवून देण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी श्री बालाजी श्रमजीवी संस्था (ट्रस्ट) आणि भटके व विमुक्त विकास परिषद यांच्या वतीने अहिल्यानगर शहरात तीन दिवसीय ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत राज्यभर विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच पार्श्‍वभूमीवर या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.


मंगलगेट येथील काशीकापडी समाज मंदिर, जे. जे. गल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला भटके-विमुक्त समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसीय अभियानात सुमारे 120 नागरिकांना जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती, निवडणूक ओळखपत्र तसेच मतदार नोंदणी यांसह विविध शासकीय कागदपत्रे व योजनांसंदर्भात आवश्‍यक मार्गदर्शन आणि मदत करण्यात आली.


या अभियानाचे आयोजन श्री बालाजी श्रमजीवी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ वाडेकर आणि जिल्हा अशासकीय समिती सदस्य मुकेश चखाले यांच्या पुढाकाराने करण्यात आले. अभियानाचे उद्घाटन भाजपा भटक्या-विमुक्त आघाडीचे तुषार पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी गाडगे महाराज आश्रमशाळा, टाकळी काझीचे मुख्याध्यापक अशोक सुरोशी, आश्रमशाळेचे राजू हारदे, अहिल्यानगर जिल्हा काशी कापडी समाजाचे अध्यक्ष रमेश भिंगारे, सोमनाथ वराट, अर्जुन चव्हाण, अनिल निकम आदी उपस्थित होते.


यावेळी प्रास्ताविक करताना राजाभाऊ वाडेकर म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना व सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर शहरात तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


भटक्या जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबांकडे आवश्‍यक शासकीय कागदपत्रे, दाखले आणि ओळखपत्रे उपलब्ध नसतात. परिणामी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सवलती, आरक्षण तसेच इतर सुविधांचा लाभ घेताना या समाजातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा केवळ आवश्‍यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे पात्र असूनही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना त्यांच्या वस्त्यांमध्येच आवश्‍यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन आणि प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष अभियान राबविण्यात आले. नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आवश्‍यक माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी या शिबिराचा उपयोग झाला.


या विशेष अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका (रेशन कार्ड), नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आयुष्मान भारत कार्ड, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्‍यक कागदपत्रे व सुविधांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पात्र नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी आवश्‍यक प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. विशेषतः जात प्रमाणपत्रासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांअभावी शिक्षण, नोकरी, आरक्षण आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामुळे समाजातील नागरिकांना मोठा आधार मिळाला.


भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळणे, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता होणे आणि त्यांना उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा लाभ घेता येणे, यासाठी अशा विशेष अभियानांची आवश्‍यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. शासनाच्या योजनांचा लाभ केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील कार्यकर्ते, संस्था आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्‍यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भिंगारे यांनी केले, तर आभार मुकेश चखाले यांनी मानले. अभियान यशस्वी करण्यासाठी अनिल भिंगारे, नितीन गंगेकर, अक्षय भिंगारे, सागर वाडेकर, निलेश वाडेकर, रवी अकोलकर, मयूर वाडेकर, माजी नगरसेवक राजू गंगेकर, प्रमोद भिंगारे, राजू भिंगारे, विजय निंबाळकर, गणेश गंगेकर यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *