• Wed. Sep 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

गांधी जयंतीपासून ‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’; ‘कुमन गव्हर्नन्स’विरोधात देशव्यापी अभियानाची घोषणा

ByMirror

Sep 29, 2026

सत्ता, विषमता आणि हिंसक असहिष्णुतेच्या मानसिकतेविरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा एल्गार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील शासनव्यवस्था, सार्वजनिक संस्थांची कार्यपद्धती आणि सत्तेच्या वापराबाबत प्रश्‍न उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने ‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’ या जनजागरण अभियानाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर पासून हे अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत सार्वजनिक जीवनात सत्तेचे केंद्रीकरण, सामाजिक विषमता, वर्चस्वाची मानसिकता आणि असहिष्णुता यांसारख्या प्रवृत्तींबाबत गंभीर चर्चा होणे आवश्‍यक आहे. याच पार्श्‍वभूमीवर ‘कुमन गव्हर्नन्स’ या संकल्पनेच्या माध्यमातून शासनव्यवस्थेतील नकारात्मक प्रवृत्तींकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ॲड. गवळी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार, ‘कुमन’ (KUMAN) हा शब्द ‘कुरु’, ‘मनु’ आणि ‘नथुराम’ या तीन संदर्भांशी जोडण्यात आला आहे. हे तीन संदर्भ अनुक्रमे सत्तामोह, जन्माधारित विषमता आणि द्वेषाधारित हिंसक असहिष्णुता यांचे प्रतीक म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.


‘कुरु’च्या संदर्भातून सत्ता स्वतःच्या किंवा विशिष्ट गटाच्या ताब्यातच ठेवण्याची प्रवृत्ती, इतरांचे न्याय्य हक्क नाकारणे आणि वर्चस्वासाठी नैतिक मर्यादा बाजूला सारणे, या बाबींवर भाष्य करण्यात आले आहे. ‘मनु’च्या संदर्भातून जन्माच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविणे, सामाजिक उतरंड आणि विषमता कायम ठेवणे तसेच व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या विचारसरणीवर टीका करण्यात आली आहे. तर ‘नथुराम’ हा संदर्भ वैचारिक मतभेदांचे रूपांतर द्वेषात करणे, विरोधकांचे अस्तित्व नाकारणे आणि हिंसेला समर्थन देण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून वापरण्यात आला आहे.


व्यक्तीच्या विचारांमध्ये, मूल्यांमध्ये, सवयींमध्ये आणि भावनिक प्रतिक्रियांमध्ये विशिष्ट धारणा सातत्याने रुजत गेल्यास त्या निर्णयप्रक्रिया आणि सार्वजनिक वर्तनावर परिणाम करू शकतात, अशी या संकल्पनेची मांडणी आहे. यालाच संघटनांनी ‘कुमन धारणालय’ असे संबोधले आहे.


सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेवरील दीर्घकालीन नियंत्रणाला प्राधान्य देणारी स्वार्थकेंद्रित मानसिकता सार्वजनिक हित आणि उत्तरदायित्वाला दुय्यम ठरवू शकते, असा दावा संघटनांनी केला आहे. त्यामुळे केवळ व्यक्तींच्या कृतींकडे न पाहता त्या कृतींमागील विचारसरणी आणि मानसिकतेचीही चिकित्सा व्हावी, असा या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सार्वजनिक भूमिकांवरही टीका केली आहे. त्यांच्या संदर्भात ‘दिमागी कुमन ऑफ इंडिया’ हा राजकीय टीकेतील शब्दप्रयोग वापरण्यात आला असून, सत्ता आणि संस्थांवरील नियंत्रणाशी संबंधित मानसिकतेचे ते प्रतिनिधित्व करतात, असा आरोप संघटनांनी केला आहे.


‘ऑपरेशन डिच्चू फत्ते’ अभियानात नागरिकांमध्ये संविधाननिष्ठ विवेक, सत्तेला प्रश्‍न विचारण्याचे धैर्य आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘ओळखातपासाबदला’ या सूत्रातून स्वतःच्या विचारांची तसेच सार्वजनिक कारभाराची चिकित्सा करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.


समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांवर आधारित ‘तिरंगा धारणालय’ समाजात रुजविणे हे अभियानाचे व्यापक उद्दिष्ट असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून देशभरात नागरिकांमध्ये वैचारिक आणि घटनात्मक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सार्वजनिक पदाधिकाऱ्यांचे निर्णय, त्यांचा कारभार आणि लोकहिताप्रती असलेली बांधिलकी यांची संविधानातील मूल्यांच्या आधारे चिकित्सा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सत्ता कोणत्याही व्यक्ती किंवा गटाची कायमस्वरूपी मालमत्ता नसून सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी नागरिकांप्रती उत्तरदायी राहणे आवश्‍यक आहे, हा संदेश या अभियानातून देण्याचा संघटनांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *