• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडी उपनगराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून ‘माझी हरवलेली मराठी शाळा’चा जागर!

ByMirror

Sep 26, 2026
महाराष्ट्र गीत, प्रतिज्ञा अन्‌ शाळेची घंटा ठरले आकर्षण

शालेय गणवेशातील ढोलवादक विद्यार्थ्यांनी दिला मराठी शाळा व मातृभाषा जपण्याचा संदेश


महाराष्ट्र गीत, प्रतिज्ञा अन्‌ शाळेची घंटा ठरले आकर्षण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह, भक्ती आणि जल्लोषासोबतच सामाजिक व शैक्षणिक जनजागृतीचा संदेश देत सावेडी उपनगरात ‘माझी हरवलेली मराठी शाळा’ हा आगळावेगळा उपक्रम साकारण्यात आला. मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत शालेय गणवेश परिधान केलेल्या ढोलवादक विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरातून मराठी शाळा आणि मातृभाषा संवर्धनाचा संदेश दिला.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष अर्जुन मदान यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मिरवणुकीच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविक तसेच ढोल पथकातील विद्यार्थ्यांनी मराठी शाळा आणि मातृभाषेला प्रोत्साहन देण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून मिरवणुकीला औपचारिक सुरुवात करण्यात आली. गणंत प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकाने केलेल्या दमदार वादनाने परिसर दणाणून गेला.


या मिरवणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे शालेय गणवेशातील ढोलवादक विद्यार्थी. गणवेश, दप्तर, पुस्तके आणि शाळेची घंटा अशा प्रतीकांमधून एकेकाळच्या मराठी शाळेचे भावविश्‍व साकारण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेल्या वादनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या उत्साहातही मराठी शाळा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा गंभीर प्रश्‍न प्रभावीपणे मांडण्यात आला.


आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षणाचे महत्त्व निश्‍चितच आहे. मात्र, इंग्रजीच्या प्रवाहात मराठी माध्यमाच्या शाळांशी आणि मातृभाषेशी असलेले नाते तुटू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘इंग्रजी शिका, जगाशी जोडा; पण मराठी जपा, आपल्या मातीशी नाते जोडा!’ या विचारातून नागरिकांना मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
एकेकाळी परिसरातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात मराठी शाळेतून होत असे. या शाळांनी केवळ अक्षरज्ञान दिले नाही, तर संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव, संस्कृती आणि मातृभाषेची ओळखही विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या असंख्य व्यक्तींच्या जीवनप्रवासाची सुरुवात याच शाळांमधून झाली आहे.


त्यामुळे ‘माझी शाळा हरवली… माझी भाषा हरवू नये!’ हा संदेश मिरवणुकीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गणेश विसर्जनाच्या आनंदोत्सवाला सामाजिक आणि शैक्षणिक आशयाची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला. या उपक्रमातून मराठी शाळांचे महत्त्व, मातृभाषेचे संस्कार आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपण्याचा संदेश देण्यात आला. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांचे ढोलवादन, महाराष्ट्र गीत, सामूहिक प्रतिज्ञा आणि शाळेच्या घंटेने झालेली सुरुवात यामुळे ‘माझी हरवलेली मराठी शाळा’ हा उपक्रम मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला.


–—
मराठी शाळा ही केवळ आठवण नाही, तर संस्कारांची शिदोरी
आजच्या काळात मुलांनी इंग्रजीसह आधुनिक शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी मातृभाषा आणि मराठी शाळांकडे दुर्लक्ष होता कामा नये. मराठी शाळांनी अनेक पिढ्यांना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आपल्या संस्कृतीची ओळख दिली आहे.‘माझी हरवलेली मराठी शाळा’ या संकल्पनेतून नवीन पिढीला आपल्या शाळेची आणि मातृभाषेची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांनी ढोलवादन करत दिलेला संदेश हा केवळ मिरवणुकीपुरता मर्यादित नसून मराठी भाषा आणि मराठी शाळांच्या संवर्धनासाठी समाजाने विचार करण्याची गरज अधोरेखित करणारा आहे. -अर्जुन मदान (अध्यक्ष, मोरया युवा प्रतिष्ठान)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *