लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक चळवळीला उजाळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटण्यापासून ते परीक्षांमध्ये ‘ॲडजेस्टेबल’ होण्याच्या प्रवृत्तीपर्यंतच्या प्रकारांचा सर्वाधिक धोका बहुजन समाजाला आहे. यामुळे खऱ्या गुणवत्ताधारकांवर अन्याय होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांना मोठे केले; मात्र सध्याच्या प्रवृत्तीमुळे कर्मवीरांच्या विचारांवरच घाव घातला जात असल्याची टीका रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अर्जुन पोकळे यांनी केली.
कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना अर्जुन पोकळे बोलत होते. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबार्इ भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास माजी ऑडिटर विश्वासराव काळे, जनरल बॉडी सदस्य हाजी शौकत तांबोळी, अनिल साळुंके, कॅन्सर तज्ञ डॉ. योगेश गरुड, स्कूल कमिटी सदस्य ॲड. रवींद्र शितोळे, संजय घुले, श्यामराव व्यवहारे, माजी मुख्यध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, माध्यमिकचे मुख्याध्यापक महादेव भद्रे, डॉ. मोहन देशमुख, जिजामाता कन्या निवासच्या अधीक्षिका ज्योतीताई मोकळ, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कर्डिले, राजेंद्र चोभे, पालक सौ. पोकळे, सौ. पाठक, झावरेताई, कर्डिलेताई आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्जुन पोकळे पुढे म्हणाले की, शाळेत का यावे? शिक्षण कशासाठी घ्यावे? या प्रश्नाची जाणीव विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. स्वतः शिक्षणातून डेव्हलप होणे ही काळाची गरज झाली आहे. सर्वसामान्य घटकातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक विचारांमुळे बहुजन समाजातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
हाजी शौकत तांबोळी म्हणाले की, मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी पुढे अधिकारी झाले आहेत. मातृभाषेतून चांगले शिक्षण आणि संस्कार मिळू शकतात. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजासाठी दारोदारी शिक्षण पोहोचविले. मात्र, आजच्या परिस्थितीत मराठी शाळांमध्ये पटसंख्या कमी होत चालली असून, पालकांनीही यावर विचार करण्याची गरज आहे. मराठी शाळा बंद पडून खासगी इंग्रजी शाळांना प्रोत्साहन मिळाल्यास सर्वसामान्यांना शिक्षण मिळणे अवघड बनेल. बहुजन समाजाला हा धोका आहे. सध्या एमपीएससीचा पेपर फुटणे हा समाजासाठी सर्वात घातक प्रकार आहे. पैसा आणि सत्ता हे समीकरण आता शिक्षणदेखील काबीज करत आहे. त्यामुळे कर्मवीरांचे स्वप्न भंग होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वसामान्यांनी जागरुक होण्याची गरज असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील भाषणे करुन कर्मवीर अण्णांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
अनिल साळुंके यांनी रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थी घडत असून, शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे स्पष्ट केले. ॲड. रवींद्र शितोळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीचा आढावा घेतला. विश्वासराव काळे यांनी नवीन पिढीतील मुले विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य आत्मसात करत असून, त्यांच्यामध्ये उपजत गुणवत्ता आणि कौशल्य असल्याचे सांगितले. यावेळी ‘प्रणाम तुजला कर्मवीरा’ या कवितेतून कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले. कॅन्सर तज्ञ डॉ. योगेश गरुड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात सर्वोत्तम बना, शिक्षणासोबत समाजाला देणारे बना आणि कर्मवीरांच्या प्रेरणेने स्वतःला सिद्ध करा, असा संदेश दिला.
पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदीप पालवे यांनी केले. आभार माध्यमिकचे मुख्याध्यापक महादेव भद्रे यांनी मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती गारुडकर, मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, ज्येष्ठ शिक्षक मंगेश कारखिले, सुनिता लांडगे, उमेश विलायते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

