‘माझी हरवलेली मराठी शाळा’… ढोलवादक विद्यार्थ्यांचा अनोखा जागर!; सावेडी उपनगरात रंगणार मोरया युवा प्रतिष्ठानची मिरवणुक
शालेय गणवेशातील विद्यार्थी देणार मराठी माध्यमाच्या शाळा व मातृभाषा संवर्धनाचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन मिरवणुकीतून सामाजिक आणि शैक्षणिक जनजागृतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने यंदा अहिल्यानगरमध्ये ‘माझी हरवलेली मराठी शाळा’ ही आगळीवेगळी संकल्पना साकारण्यात येणार आहे. सावेडी उपनगरातील शुक्रवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सुमारे ढोलवादक विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून ढोल-ताशांच्या गजरातून मराठी शाळा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
माजी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात येत असून, मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. गणंत प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक या मिरवणुकीत ढोल-ताशांचे सादरीकरण करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान यांनी दिली.
आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षणाचे महत्त्व नाकारता येणार नाही. आपल्या मुलांनी जगाशी स्पर्धा करावी, विविध क्षेत्रांत यश मिळवावे, यासाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे. मात्र, इंग्रजीच्या प्रवाहात मराठी माध्यमाच्या शाळा आणि मातृभाषेशी असलेले नाते तुटू नये, हा या उपक्रमामागील मुख्य संदेश आहे.
‘इंग्रजी शिका, जगाशी जोडा; पण मराठी जपा, आपल्या मातीशी नाते जोडा!’ असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. आज अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत असून, काही शाळांच्या अस्तित्वासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी शाळांचे महत्त्व आणि मातृभाषेचे स्थान अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कधीकाळी परिसरातील बहुतांश मुलांच्या शिक्षणाची सुरुवात मराठी शाळेतून होत असे. या शाळांनी केवळ अक्षरज्ञान दिले नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव, संस्कृती आणि मातृभाषेची ओळख दिली. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे प्रशासन, पोलीस सेवा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यामुळे मराठी शाळा ही केवळ भूतकाळाची आठवण नसून अनेक यशस्वी जीवनांची सुरुवात आहे, हा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुमारे ढोलवादक विद्यार्थी शालेय गणवेशात सहभागी होणार आहेत. दप्तर, पुस्तके, पाटी आणि शालेय गणवेश यांसारख्या प्रतीकांचा वापर करून एकेकाळच्या मराठी शाळेचे चित्र नागरिकांसमोर उभे केले जाणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर ‘माझी शाळा हरवली… माझी भाषा हरवू नये!’ आणि ‘इंग्रजीचे ज्ञान मिळवा, पण मराठीची मुळे विसरू नका’ असा संदेश देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात सामाजिक आणि शैक्षणिक संदेश पोहोचविणारा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेणार असून, मराठी शाळा व मातृभाषेच्या संवर्धनाबाबत नव्याने विचार करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात येणार आहे.

