विचारांना मिळाले व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाने भारावले श्रोते
सेठ नंदलाल धूत स्कूलने पटकाविला फिरता करंडक; पार्थ जरे ठरला वकृत्व स्पर्धेचा मानकरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावीपणे आपले विचार मांडत आपल्या वक्तृत्वाची छाप उमटवली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेला चांगली रंगत आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया व स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. या स्पर्धेसाठी माणिकताई करंदीकर विद्यालयाच्या शर्मिला कुलकर्णी तसेच न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्रतिभा पवार यांनी परीक्षक व प्रमुख पाहुण्या म्हणून काम पाहिले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विविध विषयांवर अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील उत्स्फूर्तता, विषयाची मांडणी, भाषेवरील प्रभुत्व आणि विचारांची स्पष्टता यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या युगातही विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता जोपासले याचे दर्शन या स्पर्धेतून घडल्याचे परीक्षकांनी नमूद केले.
यावर्षीच्या वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक विजेतेपदाचा फिरता करंडक सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविला. वैयक्तिक गटात समर्थ विद्यामंदिर प्रशाला, सावेडीचा विद्यार्थी पार्थ शिवनाथ जरे याने प्रथम क्रमांक मिळविला. सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलच्या आरुष प्रसाद बेडेकर याने द्वितीय, तर अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या अंश प्रितेश गुगळे याने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलची स्वरा आदित्य येवलेकर आणि श्री इंग्लिश मीडियम स्कूलचा आर्यन अरुण उगले यांनी यश मिळविले.
शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, उच्च प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना मुंडिवाले आणि पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांचे संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा आणि खजिनदार प्रकाश गांधी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा कमलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संध्या बोरसे यांनी करून दिला. स्पर्धेची नियमावली सांगून कल्पना लोंढे यांनी निकाल जाहीर केला. रेणुका मुळे यांनी आभार मानले.

