• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

विद्यानंद बापट, संतोष पंडित, अभिजित दिपके यांना आत्मधारणालय स्वातंत्र्य सैनिक” गौरव सन्मान जाहीर

ByMirror

Sep 22, 2026
विद्यानंद बापट, संतोष पंडित, अभिजित दिपके यांना आत्मधारणालय स्वातंत्र्य सैनिक” गौरव सन्मान जाहीर

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने होणार सन्मान; विधायक विचार आणि सामाजिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजामध्ये विधायक विचार रुजविण्यासाठी केलेले कार्य, सामाजिक योगदान आणि परिवर्तनासाठी राबविलेल्या कृतीशील उपक्रमांची दखल घेत विद्यानंद बापट, संतोष पंडित आणि अभिजित दिपके यांचा “आत्मधारणालय स्वातंत्र्य सैनिक” म्हणून गौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने बुधवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित राष्ट्रीय धारणालय स्वातंत्र्य आंदोलनात हा सन्मान केला जाणार आहे.


या आंदोलनाच्या माध्यमातून “आत्मधारणालय स्वशासन” ही संकल्पना मांडण्यात येणार आहे. व्यक्तीच्या विचारांवर, निर्णयांवर आणि वर्तनावर प्रभाव टाकणारे पूर्वग्रह, संस्कार आणि सामाजिक मूल्यव्यवस्था यांचा विवेकपूर्ण विचार करून आवश्‍यक बदल घडवून आणण्यावर या संकल्पनेत भर देण्यात आला आहे. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या मते, स्वातंत्र्य केवळ बाह्य किंवा राजकीय सत्तेपासून मुक्त होण्यापुरते मर्यादित नसून व्यक्तीच्या विचारविश्‍वात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि घटनात्मक मूल्यांना स्थान मिळणे आवश्‍यक आहे.


या भूमिकेनुसार जातीय भेदभाव, जन्माधारित विषमता, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा, द्वेष आणि हिंसा यांसारख्या सामाजिक प्रवृत्तींचा विवेकाच्या आधारे विचार करून त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या भूमिकेनुसार, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या विचारांमधील पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती ओळखून त्यांची तपासणी करावी आणि आवश्‍यक ते बदल स्वीकारावेत. त्यानंतर कुटुंब, शिक्षण, समाज आणि सार्वजनिक जीवनात घटनात्मक मूल्यांवर आधारित आचरणाचा आग्रह धरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


“आत्मधारणालय स्वशासन” ही संकल्पना व्यक्तीच्या विचारविश्‍वात विवेक, संविधान आणि लोककल्याणकारी मूल्यांना महत्त्व देण्यावर आधारित असल्याचे पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले. विद्यानंद बापट, संतोष पंडित आणि अभिजित दिपके यांनी विधायक विचार, सामाजिक योगदान आणि कृतीशील कार्यातून या संकल्पनेशी संबंधित भूमिका पुढे नेल्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रीय धारणालय स्वातंत्र्य आंदोलनात गौरव करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *