• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

वाडियापार्कमधील महादेव मंदिर परिसरात अवैध धंदे; पोलिसांकडे कारवाईची मागणी

ByMirror

Sep 22, 2026
महिला, विद्यार्थी, खेळाडू आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

दारू-गांजा विक्री व सेवनाचा आरोप; पुजाऱ्यांना धमकी, मंदिरातील वस्तूंची तोडफोड केल्याची तक्रार


महिला, विद्यार्थी, खेळाडू आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाडियापार्क क्रीडा संकुल परिसरातील महादेव मंदिराच्या ठिकाणी नशेखोर प्रवृत्तींकडून कथितरित्या सुरू असलेल्या अवैध धंद्यांना तसेच गुंडगिरीच्या प्रवृत्तींना आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या परिसरात अवैध दारू व गांजाची विक्री तसेच सेवन सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यामुळे मंदिरात येणारे भाविक तसेच क्रीडा संकुलात येणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत सतीश अशोक सायंबर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.


निवेदनानुसार, वाडियापार्क क्रीडा संकुलातील महादेव मंदिर हे सार्वजनिक ठिकाण असून, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात काही व्यक्तींकडून अवैध दारू व गांजाची विक्री आणि सेवन उघडपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.


मंदिर परिसरातील पुजारी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधितांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असून, विशेषतः महिला व मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.


दोन दिवसांपूर्वी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मंदिरातील काही वस्तूंची तोडफोड करून मंदिराची विटंबना केली. या प्रकारातून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही निवेदनात आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी करून, तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांची सत्यता तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सतीश सायंबर यांनी केली आहे.


वाडियापार्क क्रीडा संकुलात नियमितपणे महिला खेळाडू, विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी येणाऱ्या व्यक्तींची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर महादेव मंदिरात भाविकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या संवेदनशील परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मंदिर परिसराची पाहणी करावी, अवैध धंद्यांबाबत तपास करावा, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्‍यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि मंदिर परिसरात नियमित पोलीस गस्त सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *