• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सुरू करताना अहिल्यानगरची तिकीट खिडकी कमी करू नका

ByMirror

Sep 15, 2026
अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनची मागणी

नवीन गाडीसाठी नवीन कर्मचारी द्या; अहिल्यानगरचा कर्मचारी बीडला हलवू नका


अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनची मागणी


“बीडला सुविधा द्या, पण अहिल्यानगरची सुविधा हिरावून घेऊ नका!”


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सेवा 17 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे प्रशासनाचे स्वागत करत असतानाच, नवीन रेल्वे सेवेसाठी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकी किंवा कर्मचाऱ्यांची एक शिफ्ट बीड येथे हलविण्याच्या प्रस्तावाला अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष हरजीतसिंग वधवा यांनी याबाबत पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्याकडे निवेदन देऊन हा निर्णय तातडीने पुनर्विचारात घ्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई तसेच रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनाही देण्यात येणार आहे.


अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर सध्या सकाळच्या वेळेत दोन तिकीट खिडक्या, तसेच संध्याकाळपर्यंत दोन खिडक्या कार्यरत असतात. याशिवाय दिवसभर एक तिकीट खिडकी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यरत असते. सध्याच्या व्यवस्थेतही प्रवाशांना अनेकदा रांगेत उभे राहावे लागते. अहिल्यानगर स्थानकावर दररोज सुमारे 350 ते 400 तिकिटांची विक्री होते, तर विविध सेवांसाठी सुमारे 150 ते 180 तिकिटे दररोज बुक केली जातात. बीड-अहिल्यानगर-पुणे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या आणि तिकीट बुकिंगमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


अशा परिस्थितीत अहिल्यानगरमधील विद्यमान कर्मचारी किंवा एक शिफ्ट बीडला हलविल्यास उर्वरित तिकीट खिडक्यांवर अतिरिक्त भार पडेल. परिणामी प्रवाशांच्या रांगा वाढणे, तिकीट मिळण्यास विलंब होणे आणि तिकीट बुकिंग व्यवस्थेची कार्यक्षमता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील इंटरनेटचा वेगही अनेक वेळा कमी असल्याने तिकीट काढण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे उपलब्ध कर्मचारीसंख्या कमी करण्याऐवजी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.


“बीडला नवीन रेल्वे सेवा सुरू होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र नवीन सेवा सुरू करताना अहिल्यानगरचा कर्मचारी कमी करून बीडला देणे योग्य नाही. नवीन सेवेसाठी नवीन मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. अहिल्यानगरमध्ये सध्या दोन तिकीट खिडक्याही प्रवाशांच्या तुलनेत कमी पडत आहेत. त्यामुळे एक खिडकी किंवा शिफ्ट कमी केल्यास अहिल्यानगरच्या प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढतील,” असे हरजीतसिंग वधवा यांनी सांगितले.


रेल्वे प्रशासनाने अहिल्यानगरची विद्यमान तिकीट व्यवस्था कायम ठेवावी आणि बीडसाठी आवश्‍यक अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. बीडला सुविधा मिळणे हा अहिल्यानगरच्या प्रवाशांचा विरोधाचा विषय नाही. मात्र एका शहराची सुविधा वाढवताना दुसऱ्या शहराची सुविधा कमी करणे योग्य ठरणार नाही. दोन्ही शहरांतील प्रवाशांना समान आणि पुरेशा सुविधा मिळणे हा रेल्वे प्रशासनाचा उद्देश असावा, अशी भूमिका असोसिएशनने स्पष्ट केली आहे.
अहिल्यानगरच्या प्रवाशांच्या मूलभूत तिकीट सुविधेवर कोणतीही कपात स्वीकारली जाणार नाही. हा निर्णय मागे न घेतल्यास अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी ट्रेन असोसिएशनच्या वतीने प्रवाशांच्या हितासाठी शांततापूर्ण, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वे सेवा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे असोसिएशनने आभार मानले असून, या सेवेमुळे बीड आणि अहिल्यानगरच्या प्रवाशांना पुण्याशी अधिक चांगली जोडणी मिळणार असल्याचे नमूद केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *