• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्रावणी सोमवारी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्वच्छतेचा जागर; डोंगरगणच्या रामेश्‍वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

ByMirror

Sep 7, 2026
पर्यावरणसेवा भक्ती म्हणून नागरिकांनी स्विकारावी -संजय सपकाळ

स्वच्छ मंदिर, हरित परिसर’चा संदेश; हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भाविकांना खिचडी-फराळ वाटप


पर्यावरणसेवा भक्ती म्हणून नागरिकांनी स्विकारावी -संजय सपकाळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने डोंगरगण (ता. नगर) येथील श्री रामेश्‍वर महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून बेलाच्या झाडाची लागवड करण्यात आली. यावेळी भाविकांसाठी खिचडी व फराळ वाटप करण्यात आले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रुपच्या सदस्यांनी मंदिर परिसर स्वच्छ केला. महिलांच्या हस्ते बेलाच्या रोप लावून ‘स्वच्छ परिसर, हरित परिसर’चा संदेश देण्यात आला.


श्रावणी सोमवारनिमित्त रामेश्‍वर महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी केली होती. या पार्श्‍वभूमीवर हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता केली. परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर महिलांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले.


यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, राजश्री राहींज, सचिन चोपडा, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे, चेअरमन बाबासाहेब दाणे, रामेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त दत्तात्रेय पुजारी, संतोष लुनिया, जहीर सय्यद, ताराचंद ठोकळ, दीपक मेहतानी, जोगिंदरसिंग, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, सुंदर पाटील, अभिजीत सपकाळ, उमाशंकर सिंग, मुन्ना वाघस्कर, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, दशरथराव मुंडे, विठ्ठल राहिंज, रामनाथ गर्जे, अनिल हळगावकर, अविनाश जाधव, राजेंद्र चंगेडिया, श्रीरंग देवकुळे, राजू शेख, शशिकांत पवार, भारत कनोजिया, सुधीर कपाळे, अशोक पराते, सुभाष पेंडुरकर, शिरीष पोटे, अविनाश पोतदार, प्रकाश देवळालीकर, रमेश वराडे, इंजि. अनिल सोळसे, राजेश तनपुरे, जालिंदर अळकुटे, दिलीप गुगळे आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर जिल्ह्याच्या विविध भागांत सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. धार्मिक उत्सव आणि सण हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ धार्मिक विधी न करता समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पर्यावरणसेवा भक्ती म्हणून नागरिकांनी स्विकारावी. आज श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मंदिर परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण आणि भाविकांना अन्नदान करून सेवा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हे तीनही संदेश एकाच उपक्रमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक झाड लावणे ही सुरुवात आहे; मात्र त्याचे संगोपन करणे ही खरी पर्यावरणसेवा आहे. प्रत्येकाने धार्मिक उत्सवाला किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर आपल्या परिसरात मोठा सकारात्मक बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन चोपडा म्हणाले की, स्वच्छता ही केवळ एखाद्या संस्थेची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. मंदिरात आपण श्रद्धेने जातो, त्याच श्रद्धेने मंदिराचा परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. आज लावलेले एक रोप भविष्यात शेकडो भाविकांना सावली देईल, पक्ष्यांना आसरा देईल आणि परिसराचे सौंदर्य वाढवेल. त्यामुळे धार्मिक भावना आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणारे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून अशा उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा असल्याचे ते म्हणाले.


सरपंच कैलास पठारे म्हणाले की, “हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात वर्षभर विविध ठिकाणी स्वच्छता, वृक्षारोपण, अन्नदान आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबवून ग्रुपने सेवाभावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डोंगरगणच्या रामेश्‍वर महाराज मंदिर परिसरात श्रावणी सोमवारच्या दिवशी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण करून त्यांनी धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची आस्था निर्माण होते. डोंगरगण ग्रामस्थांच्या वतीने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या कार्याचे स्वागत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


वर्षभर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाची चळवळ पुढे नेल्याबद्दल डोंगरगण येथील श्री रामेश्‍वर महाराज मंदिराच्या वतीने हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या ग्रुपच्या उपक्रमांचे मंदिर विश्‍वस्त, ग्रामस्थ आणि भाविकांनी कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *