• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्लीचा महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर

ByMirror

Sep 4, 2026
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर झाला आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांनी शेख यांना फेलोशिप जाहीर झाल्याचे कळविले आहे.


12 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या 42 व्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात ही फेलोशिप मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. ते स्वत: एक उत्कृष्ट कुस्तीपटू होते, त्यांनी अनेक खेळाडू देखील घडविले आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे, या विचारातून त्यांनी सातत्याने काम केले आहे.


शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी ज्या-ज्या गावांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी लोकसहभागातून शाळा विकासाची चळवळ उभी केली. किन्ही, गारखिंडी (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती उभारण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर झाला आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *