शिबिराद्वारे गरजूंच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न -मेजर शिवाजी वेताळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हाभर मोफत नेत्र तपासणी शिबिरे राबविणाऱ्या पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आंबेवाडी पावन गणपती (ता. पाथर्डी) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भाविकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे हे 263 वे शिबिर होते. तपासणीदरम्यान मोतिबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांवर पुणे येथे केली जाणार आहे.
कै. सुखदेव माधवराव वेताळ यांच्या स्मरणार्थ या आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याचा फायदा घेत त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा स्तुत्य उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वेळेत नेत्र तपासणी व उपचार मिळावेत, यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध गावांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत.
या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ व सुभेदार मेजर संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविक व ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्रविकार असलेल्या रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीत मोतिबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची नोंद करून पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
डॉ. कोरडे यांनी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नेत्रविकारांची लक्षणे कोणती, नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व काय आहे, याबाबत माहिती दिली. यावेळी मयुर चव्हाण, अनिल चव्हाण, दिलीप राठोड, अंबादास चव्हाण, संजय चव्हाण, विमल चव्हाण, लीलाबाई चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेजर शिवाजी वेताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना नेत्रविकार असूनही आर्थिक परिस्थिती किंवा योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते वेळेवर उपचार घेत नाहीत. परिणामी आजार बळावतो आणि अनेकदा दृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे गावागावांत जाऊन नागरिकांची नेत्र तपासणी करण्याचा संस्थेने संकल्प केला आहे. हा उपक्रम केवळ एक शिबिर नसून गरजूंच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तपासणीत मोतिबिंदू आढळलेल्या गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून, कोणताही गरजू नागरिक केवळ पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभेदार मेजर संजय राठोड म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागते. अनेक वेळा खर्चाचा विचार करून नागरिक तपासणी व उपचार पुढे ढकलतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्यसेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. नेत्र तपासणी ही केवळ आजाराचे निदान करणारी प्रक्रिया नसून एखाद्या व्यक्तीची दृष्टी वाचविण्याची पहिली पायरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आल्याने आंबेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाला सेवाभावी उपक्रमाची जोड मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषाताई राठोड यांनी केले. अनिता शिवाजी वेताळ यांनी आभार मानले.

